आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक, 22 बळी; खान्देश, मराठवाड्यात सतर्कता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - स्वाइन फ्लूने राज्यात पुन्हा डोके वर काढले आहे. जानेवारी महिन्यात दररोज सरासरी दोन या वेगाने ७८ व्यक्तींना या विषाणूने गाठले आहे, तर गेल्या महिनाभरात स्वाइन फ्लूने २२ जणांचे बळी घेतले आहेत.

सन २०१० मध्ये महाराष्ट्रात स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक ६६९ लोक मृत्यू पावले होते. त्यानंतरच्या चार वर्षांत संसर्गाचे प्रमाण आटोक्यात राहिले. यंदा वर्षाच्या पहिल्याच महिन्यात स्वाइन फ्लूने वेगाने पाय पसरले आहेत. आरोग्य खात्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, राजस्थान, गुजरात, तेलंगण येथे स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही देशातील सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण विदर्भात आहेत. पुण्यातही काहींना लागण झाली आहे. गुजरात आणि तेलंगण राज्यांमधला उद्रेक लक्षात घेता खान्देश आणि मराठवाड्यातील नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.

लातूरमध्ये ३ रुग्ण
लातूर विभागात ३ संशयित रूग्ण आहेत. शहरात एका महिलेवर १९ जानेवारीपासून उपचार करण्यात येत आहे. सध्या ती व्हेंटिलेटरवर असून प्रकृती स्थिर आहे. चाकूर येथील संशयित रुग्णाला लातूरमध्ये हलवण्यात आले आहे. नांदेड येथेही संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. सूर्यकांत निसाले यांनी सांगितले. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर कर्नाटकातील बिदर जिल्हा आहे. तेथेही एक संशयित रुग्ण आढळून आल्याने सीमाभागातून या रोगाचा संसर्ग होण्याची भीती आहे.

राज्यातील बळी
सन रुग्ण मृत्यू

२०१० ६११८ ६६९
२०११ ४२ ०६
२०१२ १५६४ १३५
२०१३ ६४३ १४९
२०१४ ११५ ४३