आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या 22 वर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - हवामानातील तीव्र बदलांमुळे विषाणूजन्य रोगांचे प्रमाण वाढत असून, ऋतू संधिकालात स्वाइन फ्लूच्या संसर्गाचा धोका वाढल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूने 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर राज्यात गेल्या तीन महिन्यांत बळींची संख्या 22 वर गेली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याचे सहसंचालक डॉ. व्ही. डी. खानंदे यांनी दिली.

डॉ. खानंदे यांनी आरोग्य खात्यातील तज्ज्ञांची विशेष बैठक बोलावली होती. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (एनआयव्ही) काही शास्त्रज्ञही या बैठकीस उपस्थित होते. आरोग्यतज्ज्ञ, संशोधक तसेच ससून रुग्णालयातील तज्ज्ञांना स्वाइन फ्लूच्या उद्रेकाविषयी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे डॉ. खानंदे म्हणाले. पावसाळा संपून हिवाळा सुरू होताना, तसेच हिवाळा संपून उन्हाळा सुरू होताना वातावरणात होणारे बदल विषाणूंच्या प्रसाराला हातभार लावतात. त्यामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. विशेषत: स्वाइन फ्लूच्या एच1एन1 या विषाणूंचा संसर्ग जलद गतीने होतो. गेल्या वर्षीही मार्च महिन्यात या रोगाने काही बळी घेतले होते. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेतल्यास स्वाइन फ्लू आटोक्यात राहील, असे डॉ. खानंदे म्हणाले.


डॉक्टरांचा सल्ला घ्या
हवामानातील बदलामुळे स्वाइन फ्लूचा प्रसार होत आहे. दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस औषधानंतरही ताप, खोकला, घसा दुखणे न थांबल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, तसेच डॉक्टरांनी अशा रुग्णांना टॅमिफ्ल्यूचा डोस द्यावा, असे डॉ. व्ही. डी. खानंदे यांनी सांगितले.