आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट विठ्ठलाच्या लावणीची..... ..... आणि ती लिहिणा-याची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पंढरीचे सावळे परब्रह्म हे लाखो वैष्णवांचे आराध्य दैवत.. या दैवताच्या पूजन, स्मरण आणि स्तवनासाठी संतांनी, पंतांनी, भक्तांनी कित्येक माध्यमे उपयोजिली.. अभंग, ओवी, भारूड, गवळण, स्तोत्रे, भजने, कवने..पण श्रीविठ्ठलाची लावणी लिहिणारा मात्र फक्त एकच होता..आणि तो म्हणजे शाहीर परशराम.. या शाहिराने चक्क विठ्ठलाचीच लावणी रचली आहे.


‘साक्षात पंढरी देव दिगंबरमूर्ती
जडमुढा तारिते विठ्ठल तूर्तातूर्ती’
अशी खणखणीत सुरुवात असलेली ही लावणी दुर्मिळ मानली जाते. शाहीर परशराम हा उत्तर पेशवाई काळातील रचनाकार होता. त्याने शृंगारिक लावण्याही रचल्या होत्या, अन्य रचनाही केल्या. परशरामाची शेंदाड शिपायाची लावणीही
प्रसिद्ध आहे.


‘जुने डोळे नवे तमाशे,
आम्ही पाहिले फार
सखे, दे सोडुनी वेडाचार’,

असे त्याचे कवन प्रसिद्ध आहे. त्याने गण, फटके यांचीही रचना केली. पण साक्षात विठ्ठलाची लावणी रचून त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आणि ओवीतील, अभंगातील, भारुडातील, गवणळीतील विठ्ठलाप्रमाणेच लोकवाणीतील विठ्ठल लावणीतून मांडला.


परशरामाच्या लावणीतील काही ओळी.....
तो ज्ञानेश्वर तो विठ्ठल मूर्तिमंत
बोलविले वेद रेड्यामुखि,
चालविली भिंत
बारा वर्षे वाहिले पाणी नाथाघरी तंत,
स्वर्गिचे आणिले पितर करुनी जिवंत
बोधल्याचे फिरवले घनदाटाचे शेत
दामाजी भरली रसद पेटविले पोत
गौळणी त्यात प्रत्यक्ष वेदांच्या श्रुति
पुढे रामकृष्ण अवतार गोकुळाप्रति
रे पंचमहापातके दर्शने तरती
जनमूढ तारितो विठ्ठल तूर्तातूर्ती


परशरामाची लावणीतून विठ्ठलरूपाची प्रचिती
या लावणीतून परशरामाने विठ्ठलाचा गोतावळाच वर्णन केला आहे. भक्तियुक्त अंत:करणाच्या भक्ताचा योगक्षेम विठ्ठल कसा चालवतो, याचे हे वर्णन आहे. त्यात अवतार आहेत, संतांचे चमत्कार आहेत, परंपरा आहे, चरित्रात्मक अंश आहेत, पण हा तपशील झाला. परशरामाला त्यातून जनमुढा तारितो विठ्ठल, हेच अधोरेखित करायचे आहे. आज सातशे वर्षांहूनही अधिक वर्षांची आषाढी वारीची परंपरा पाहिली की परशरामाला अभिप्रेत असणा-या या विठ्ठलाच्या रूपाची प्रचिती येऊ लागते. - डॉ. रामचंद्र देखणे, संत व लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक