आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोष्‍ट भटक(ळ)लेल्‍या यासि‍नची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जर्मन बेकरीतद सतरा जणांचे बळी
० मंगेश फल्ले . पुणे
पुण्यातील उच्चभ्रू वसाहतीतील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत 13 फेब्रुवारी 2010 रोजी बॉम्बस्फोट घडवून इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या अहमद सिद्दिबप्पा झरार ऊर्फ यासीन भटकळ याने 17 जणांचे बळी घेतले होते. घटनास्थळी बॉम्बची बॅग ठेवताना यासीन बेकरीतील सीसीटीव्हीत कैद झाला होता. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हे चित्रण एक प्रबळ पुरावा म्हणून न्यायालयात सादर केले आहे. तसेच स्फोटाच्या दिवशी यासीन भटकळ व या प्रकरणात फाशी सुनावण्यात आलेला आरोपी हिमायत बेग यांना एकत्रित रिक्षातून सोडल्याची साक्षही एका रिक्षाचालकाने न्यायालयात दिली आहे. यासीनच्या अटकेमुळे या स्फोटाचा प्रमुख सूत्रधार ताब्यात आला आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसने यापूर्वीच यासीन भटकळसह मोहसीन चौधरी, रियाज इस्माईल शहाबद्री ऊर्फ रियाज भटकळ, इक्बाल इस्माईल शहाबद्री ऊर्फ इक्बाल भटकळ, फय्याज कागझी ऊर्फ झुलिफर फय्याज अहमद व सय्यद जबिउद्दीन सय्यद झकिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदाल यांना फरार घोषित केले होते, तर मिर्झा हिमायत इनायत बेग याला अटक केली. पुणे न्यायालयाने त्याला 15 मार्च 2013 रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
खुद्द यासीनने बेकरीत ठेवला बॉम्ब
यासीन व हिमायत हे दोघे उदगीरवरून बॉम्ब घेऊन 13 फेब्रुवारी 2010 रोजी पुण्यात दाखल झाले. त्यांनी पुणे स्टेशन ते कोरेगाव पार्क परिसरातील सेंट्रल मॉल यादरम्यान रिक्षाप्रवास केला. त्यानंतर हिमायत दुचाकी घेऊन औरंगाबादला पसार झाला, तर यासीन बॉम्ब ठेवण्यासाठी जर्मन बेकरीत गेला. जर्मन बेकरीत यासीन काउंटर जवळ टोपी घातलेला व दोन बॅग जवळ बाळगलेल्या अवस्थेत सीसीटीव्हीत कैद झाला होता.


उदगीरच्या कॅफेत बॉम्बनिर्मिती
यासीन याने पुण्यात अनेक वेळा वास्तव्य केलेले असून तो बॉम्ब बनविण्यात तरबेज आहे. पुण्यासह, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर आदी शहरांमध्ये इंडियन मुजाहिदीनचे जाळे पसरणे, तेथील युवकांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देणे ही कामे तो करायचा. हिमायत बेग हा फय्याज कागझी याच्या माध्यमातून रियाझ भटकळच्या संपर्कात आला होता. रियाझने यासीन व मोहसीन चौधरी यांना डिसेंबर 2009 मध्ये उदगीरला बेगशी चर्चा करण्यास पाठविले. त्यानंतर उदगीर येथील बेगच्या ग्लोबल सायबर कॅफेत यासीन, मोहसीन व हिमायत यांनी बॉम्ब बनवला होता.


मावसभावाचीही कटाची कबुली
यासीन भटकळ याचा मावसभाऊ अब्दुल समद याला सौदी अरेबियातून देशात मंगलोर येथील विमानतळावर आल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. तो यासीनसारखाच दिसत असल्याने त्याला जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी अटक केल्याचे सुरुवातीला काही माध्यमांनी प्रसारित केले. एटीएसने देशातील अतिरेक्यांचा एक फोटो अल्बम बनवला असून त्यात अब्दुल समद याने यासीनचा फोटो ओळखला होता. तसेच तो जर्मन बेकरी स्फोटात सामील असल्याची साक्ष मुंबई एटीएसचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश कदम यांनी जर्मन बेकरी खटल्यात दिली होती.


दगडूशेठ मंदिरातील स्फोटाचा कट
पुण्यासह देशभरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्बस्फोट करण्याचा कटही यासीन भटकळने याने आखला होता. यासाठी त्याने मोहमंद कातिल सिद्दिकी याला बॉम्ब घेऊन मंदिर परिसरात पाठवलेही होते; परंतु एका जागरूक फूलविक्रत्याने कातिलला ही बॅग ठेवण्यास विरोध केल्यामुळे हा कट फसला होता. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना 8 जून 2012 रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळ व आलोक भालेराव या दोन कैद्यांनी नाडीने गळा आवळून कातिलचा खून केला होता. त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिदीनने जंगली महाराज रस्त्यावर एक ऑगस्ट 2012 रोजी साखळी बॉम्बस्फोट घडवले.
यासीन भटकळच्या अटकेने इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटनेला जबर धक्का बसला आहे. देशभरातील 11 शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवणारा भटकळ पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय, दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे बाहुले होता. धर्मांधतेने झपाटलेल्या या बाहुल्याने गेल्या सुमारे आठ वर्षांत 600 निरपराध नागरिकांचे बळी घेतले. मुंबई हल्ल्यातील अजमल कसाब, संसद हल्ल्यातील अतिरेकी अफझल गुरू यांना फासावर चढवल्यानंतर बॉम्बगुरू अब्दुल करीम टुंडा आणि आता यासीन भटकळ अशा म्होरक्यांच्या मुसक्या आवळण्यात यूपीए सरकारला यश मिळाले आहे. ढासळता रुपया, वाढत्या महागाईमुळे देशात सरकारविरुद्ध असंतोष असताना भटकळ हाती लागल्याने सरकारची ‘पत’ काही प्रमाणात का होईना सावरली गेली आहे.