आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी त्रास दिल्याने अभियंता मुलाने केला पित्याचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लहानपणी आईचे निधन झाल्यावर सावत्र आईसह वडिलांनीही त्रास दिल्याचा राग मनात घर करून राहिल्याने एका 24 वर्षीय अभियंत्याने आपल्या पित्याचा खून केल्याची घटना पिंपळे गुरवमध्ये पुढे आली आहे. घरात कोणी नसताना पित्याच्या मानेवर चाकूने वार करून मुलाने हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मुरगन सी एम (60) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा प्रदीपकुमार एम (24 ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे हे कुटुंब तामिळनाडूतील आहे. प्रदीपकुमार याच्या आईचे तो लहान असतानाच निधन झाले. त्यानंतर त्याचे वडिल मुरगन यांनी दुसरा विवाह केला. मात्र, त्याला लहानपणासून सावत्र आईसह वडिलांनी दुय्यम वागणूक दिली होती. मात्र, परिस्थितीशी झगडत तो अभियंता झाला. त्याला दोन वर्षापूर्वी हिंजवडीतील एका बड्या कंपनीत नोकरी मिळाली होती. गेल्या एक-दीड वर्षापासून तो पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे-गुरव परिसरात राहत होता.
मात्र, मागील आठवड्यात त्याची सावत्र आई व वडिल त्याच्याकडे आले होते. त्यातच सावत्र आईने व वडिलांनी पैसे त्याला मागितले. त्याने नाही म्हटल्यावर सावत्र आई रागाने दोन दिवसापूर्वी तामिळनाडूला निघून गेली. त्यामुळे वडिल व प्रदीपकुमार यांच्यात वाद झाले. गुरूवारी रात्री जेवण झाल्यावर पुन्हा मुरगन यांनी वाद काढला. त्यामुळे घरात कोणी नसताना प्रदीपकुमारने वडिलांच्या मानेवर चाकूने वार केले. यात मुरगन यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर प्रदीपकुमार घराबाहेर येऊन रडत बसला. त्याचवेळी घरमालकाने त्याला हटकले तेव्हा तो काहीच बोलला नाही. घरमालकाने घराची पाहणी केली असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर प्रदीपकुमार स्वत: पोलिसात दाखल झाला. घरमालकांनी प्रदीपकुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, 22 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...