आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक कोटी ९२ लाख विद्यार्थी ऐकणार मोदींचे विचार; सक्ती नाही, तरी ९५ हजार शाळांमध्ये तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येत्या ५ सप्टेंबर रोजी म्हणजेच शिक्षकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील एकूण ९८ हजार ७९५ पैकी ९५ हजार १८५ शाळांमधून पंतप्रधानांचे भाषण ऐकवण्याची तयारी झाली आहे. पहिली ते बारावी या वर्गांतल्या तब्बल १ कोटी ९२ लाख ४९ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पंतप्रधानांचे विचार पोहोचवले जाणार आहेत.
शिक्षक दिनानिमित्त देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा मनोदय पंतप्रधान मोदी यांनी पूर्वीच जाहीर केला. याची सोय शाळांनी करावी, असे आवाहन केंद्र सरकारतर्फे करण्यात आले. हा उपक्रम ऐिच्छक असला तरी राज्याच्या शिक्षण विभागाने त्याची जय्यत तयारी केली आहे.
राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांनी सांगितले, की पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकवले जावे, अशी कोणतीही सक्ती केंद्राने केलेली नाही. मात्र जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानांचा संवाद विद्यार्थ्यांशी होत असेल तर त्यात गैर काही नाही. लोकशाहीत संवाद महत्त्वाचा असतो, याच उद्देशाने पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची तयारी केली.

महाविद्यालयांना सूचना करणार
"महाविद्यालयीन तरुणांना पंतप्रधानांचे भाषण ऐकवण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत सूचना केंद्राकडून दिली गेलेली नाही. मात्र, देशाच्या भावी पिढीने पंतप्रधानांचे विचार ऐकले पाहिजेत, या उद्देशाने विद्यापीठांच्या कुलसचिवांमार्फत सर्व महाविद्यालयांना मोदी यांचे भाषण ऐकवण्याची सूचना काढली जाणार आहे.'
डॉ. प्र. रा. गायकवाड, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय.

फीडबॅकही मिळणार
रेडिओ, टीव्ही, इंटरनेट आदींच्या माध्यमातून पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. मोदींचे भाषण झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा "फीडबॅक' केंद्राने मागितला आहे. त्यानुसार किती शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोदींचे विचार ऐकले याचीही माहिती केंद्र सरकारला दिली जाणार आहे.