पुणे - गेली १५ वर्षे सत्तेत असल्याने तुमच्या सर्व अडीअडचणी आम्हालाच माहिती आहेत. नव्या लोकांना निवडून दिले तर प्रश्न समजून घेण्यातच त्यांची पाच वर्षे जातील. त्यामुळे आम्हालाच पुन्हा निवडून द्या, असे आवाहन अजित पवार यांनी शुक्रवारी केले. तसेच सत्तेत आल्या आल्या तुमचा कार्यक्रमच करतो, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
राज्य सरकारतर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान सोहळ्यात पवार बोलत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, शिक्षण सचिव अश्विनी भिडे, शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम आदी उपस्थित होते. या वेळी १०६ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. एकदा का तुम्ही (शिक्षक) निर्णय घेतला की मग आम्ही पुन्हा (सत्तेत) आलोच, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. राज्य आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक लाख, तर जिल्हा परिषद पुरस्कारप्राप्त शिक्षकांना ५० हजार रुपयांच्या बक्षीसचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणा त्यांनी केली.
राज्य उच्च शिक्षणात मागे का? -
मुख्यमंत्री : अर्थव्यवस्था भक्कम असलेला महाराष्ट्र उच्च शिक्षणात मागे का, असा सवाल करत मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासोबत गुणवत्तावाढीचे आव्हान आहे. इंग्रजी, गणितावर भर द्यावा लागेल. पुढील पाच वर्षांत सर्व शाळांमधे तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतके बदल शिक्षण क्षेत्रात घडवून आणू, असा दावा त्यांनी केला.
राज्य शिक्षक पुरस्कार विजेते
प्राथमिक शिक्षक : {काशीनाथ उद्धवराव खंडापुरे (आवलगाव, ता. सोनपेठ, परभणी) {संजय सुरेश शास्त्री, (भोकरदन, जालना) {हेमलता प्रकाश जोशी (पिंपळखुंटा, औरंगाबाद) {शोभा सदाशिव तिडके (बीड) {सुभाष रामलिंगप्पा वैरागकर (नळदुर्ग, उस्मानाबाद) {मच्छिंद्र तुळशीराम गुरमे (चिकलठाणा, लातूर) {रावसाहेब पुंजाजी भोसले (वसमतनगर, हिंगोली).
माध्यमिक शिक्षक : {गणेशसिंह रामसिंह गौर (औरंगाबाद) {बाबूराव हणमंतू रामोड (कुंडलवाडी, नांदेड) {प्रमोद बाळकृष्ण मुळे (परभणी) {अशोक कुंडलिक खरात (दाभाडी, जालना) {नूरअहमद मौलासाहेब घाटवाले (उमरगा, उस्मानाबाद) {जालिंदर मसुराम पैठणे (बीड) . {भास्करराव दशरथ सांगले (टाकळी काझी, नगर) {अरुण अवचित कोळी (बामणोद, ता. यावल, जळगाव) {शिवाजी भागुजी शिरसाट, (पिंपळगाव बहुला, नाशिक)
फौजियांच्या ‘भयानक’ भाषणाने माना झुकल्या
शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या ‘भयानक’ भाषणाने कहर केला. शिक्षकांना ‘अविभादन\' करून भाषण सुरू केलेल्या फौजियांना एकही वाक्य धड मराठीत बोलता आले नाही. \"शिक्षकांचा एकही प्रश्न सुटता कामा नाही याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे,’ असे म्हणणाऱ्या फौजियांना
आपल्या विधानाने अनर्थ होत असल्याचे लक्षात आले नाही. तेव्हा तर मुख्यमंत्र्यांनीही मान खाली घातली.