आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Bhatkal Made Community Page On Facebook, Effort To Gather People

फेसबुकवर दहशतवादी भटकळचे कम्युनिटी पेज, सहानुभूतीसाठी समर्थक एकत्र आणण्याचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक मोहंमद अहमद सिद्धीबप्पा ऊर्फ यासीन भटकळचे कम्युनिटी पेज तयार करून फेसबूकवर त्याचे समर्थक एकत्र आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.यासीनच्या कम्युनिटी पेजवर त्याच्या संदर्भातील बातम्या, ऑनलाइन अपडेट्स व इलेक्ट्रॉनिक बातम्यांचे संकलन केले जात असून ते वेळोवेळी अपडेट केले जात आहे.
यासीनसह असदुल्लाह अख्तर जावेद अख्तर ऊर्फ तबरेज यांना राष्‍ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) भारत-नेपाळ सीमेवर 28 ऑगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर लगेचच 29 ऑगस्टलाच हे पेज तयार करण्यात आले. पेजवर यासीनचा दाढी वाढलेला प्रोफाइल फोटो अपलोड केला असून कव्हर पेजवर छोटा फोटो आहे. इंडियन मुजाहिदीनचा सदस्य तहसीन अख्तर वसीम अख्तर शेख ऊर्फ मोनू हा राजस्थान, दिल्ली, गोवा व महाराष्‍ट्र राज्यातील पर्यटकांना लक्ष्य करण्याची शक्यता असल्याने सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याची हेरॉल्ड पब्लिकेशनची बातमी या पेजवर गेल्या बुधवारी अपडेट केली आहे.
विविध स्फोटात सहभागी असलेले उजव्या विचारसरणीचे आठ दहशतवादी पोलिसांना सापडले नाहीत. ही बातमीदेखील कम्युनिटी पेजवर टाकण्यात आली आहे.
चौकशीनंतर कारवाई
यासीन भटकळचे कम्युनिटी पेज फेसबुकवर कार्यरत असेल, तर त्याचा पोलिस योग्य पद्धतीने तपास करतील. तसेच यात कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली कडक कारवाई करण्यात येईल. हे कम्युनिटी पेज तयार करण्याचे कारण काय, याचा शोध घेण्यात येईल. तसेच पेजवर यासीनबाबतची माहिती कोण अपडेट करतो, याचाही शोध घेतला जाईल.- एस. एम. बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल