आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Testy, Nutritional Wheat Developed By Agharkar Research Instution

चवदार, पौष्टिक गव्हाचे वाण आघारकर संशोधन संस्थेने केले विकसित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चपात्या-ब्रेड बनवण्यासाठी उत्कृष्ट व अधिक पोषणमूल्य असलेल्या गव्हाचे सुधारित वाण आघारकर संशोधन संस्थेतील संशोधकांनी विकसित केले आहे. या वाणाचे नामकरण ‘एमएसीएस 6478’ असे करण्यात आले असून नोंदणीसाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) समितीकडे पाठवण्यात आले आहे.
‘आघारकर’मधील जनुकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सतीशचंद्र मिर्शा आणि वनस्पती विकृतीशास्त्रज्ञ बी. के. होनराव या प्रमुख संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली हे वाण विकसित करण्यात आले आहे. सन 2010 पासून देशाच्या विविध भागांत या वाणाच्या उत्पादन चाचण्या घेतल्या गेल्या. मात्र, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधील हवामानाला हे वाण अधिक चांगला प्रतिसाद देत असल्याचे सिद्ध झाले आहे.
डॉ. मिर्शा यांनी सांगितले, ‘14 नोव्हेंबरपूर्वी पेरणी झाल्यास आणि पाण्याच्या नियमित पाळ्या दिल्यास या वाणापासून उत्कृष्ट उत्पादन मिळते. गव्हाच्या एका लोंबीत 27 दाणे येत असल्याचे निष्कर्ष निघाले आहेत. बुरशीजन्य रोगांविरुद्धची चांगली प्रतिकारक्षमता हे या वाणाचे खास वैशिष्ट्य आहे’, असे ते म्हणाले. पुढील वर्षापासून हे सुधारित वाण शेतकर्‍यांना उपलब्ध होईल.
शेतकर्‍यांसाठी उपयुक्त
* काळ्या, तांबड्या (तांबेरा) बुरशीजन्य रोगांना प्रतिकारक असलेले हे वाण 99 ते 110 दिवसांत काढणीस येते.
* इतर सुधारित वाणांच्या तुलनेत अधिक उत्पन्न. सर्वोच्च उत्पन्न हेक्टरी 65.7 क्विंटलपर्यंत मिळवण्यात यश आले.
* सरासरी उत्पन्न हेक्टरी 45.4 क्विंटल मिळाले. वजनाला चांगले वाण आहे. हजार दाण्यांचे वजन 49 ग्रॅम भरले. पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात साडेपाच टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. वजनाला चांगले वाण.
खाणार्‍यांसाठी पौष्टिक
* या वाणात अधिक पोषणमूल्ये आहेत. सरासरी 14 टक्के प्रोटीन, 2.99 पीपीएम बीटा कॅरोटीन, 44.1 पीपीएम झिंक, 42.8 पीपीएम लोह आढळले.
* प्रक्रियेसाठी उत्कृष्ट म्हणजेच निश्चित निकषांनुसार या वाणाला चपातीसाठी दहापैकी 8.05 आणि ब्रेडसाठी 6.93 टक्के गुण मिळाले.
* रंगाला लालसर, चमकदार, अधिक गरदार दाणे.