आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टीईटी’चा फुटलेला पेपर रद्द, व्हॉट्सअॅपवर व्हायरल; पुणे, बीडसह चार ठिकाणी गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/ बीड - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पहिला पेपर सुरू होण्यापूर्वीच शनिवारी बीड, धुळे आणि पुण्यासह चार ठिकाणी व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाला, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महावीर माने यांनी दिली. त्यामुळे हा पेपर रद्द करण्यात आला असून तो पुन्हा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात यंदा तिसऱ्यांदा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. गेल्या दोन वर्षांचे निकाल पहाता ही परीक्षा अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षांचा निकाल अद्याप पाच टक्क्यांच्या पुढे गेलेला नाही. या परीक्षेसाठी राज्यातून ऑनलाइन नोंदणी केलेल्या परीक्षार्थींची संख्या ३ लाख २५ हजार ९४४ इतकी होती. त्यापैकी पेपर एकच्या परीक्षेसाठी १ लाख ९१ हजार ३७० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती माने यांनी दिली. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी पेपर एक असतो तर सहावी ते आठवीसाठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी पेपर दोन घेतला जातो. शनिवारी सकाळी १०.३० वाजता पेपर सुरू होण्याच्या दरम्यानच बीडमध्ये व्हॉट्सअॅपवर एका उमेदवाराकडे पेपर आढळून आला. त्याची माहिती घेत असतानाच बीडमध्ये आणखी एका ठिकाणी असा प्रकार घडल्याचे समोर आले. तसेच पुण्यात कोथरुड येथेही एकाकडे व्यक्तीकडे या पेपर संदर्भातील व्हिडियो क्लिप आढळून आली. ही व्यक्ती ही परीक्षार्थी नव्हती. धुळ्यातही व्हॉट्सअॅपवरच पेपर आढळून आला आला. यासंदर्भात कोथरूड, बीड आणि धुळे जिल्ह्यात एका ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान इयत्ता सहावी ते आठवीसाठीचा घेण्यात येणारा पेपर दोन हा सुरळीत पार पडला असून त्याबाबत अद्याप तरी कोणतीच तक्रार नाही. त्यामुळे हा पेपर पुन्हा घेण्याची आवश्यकता नाही. पेपर एक हा पुन्हा कधी घेण्यात येईल याबाबत शासनाचे आदेश येतील व त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. अद्याप याबाबत काहीच सांगता येणार नाही, असे माने म्हणाले.

४८ तासांत अहवाल द्या
टीईटीचा पेपर फुटणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. शिक्षण सचिव नंदकुमार यांना कडक भूमिका घेत ४८ तासांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. यात कितीही मोठा अधिकारी दोषी असेल तरीही त्याच्यावर कडक कारवाई करू.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री