आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागर बिराजदारकडून महेशचा धक्कादायक पराभव, सुमोच्या लढतीने जिंकली प्रेक्षकांची मने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ६० व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दुसऱ्या दिवशी विजेतेपदाच्या दावेदारांपैकी एक असलेल्या महेश मोहोळला पहिल्याच फेरीत लातूरच्या सागर बिराजदारने पराभूत करत धक्कादायक निकाल नोंदवला. दुसरीकडे डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, दावेदार सचिन येलभरने आपापल्या लढतीत जिंकत आगेकूच केली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने होत असलेली ही स्पर्धा वारजे येथील कै. रमेशभाऊ वांजळे क्रीडानगरीत सुरू आहे. महाराष्ट्र केसरी गटात पहिल्याच फेरीत महेश मोहोळला रुस्तम-ए-हिंद स्व. हरिश्चंद्र बिराजदार यांचा मुलगा लातूरच्या सागर बिराजदारने मात दिली. दोन्ही मल्लांनी आक्रमक सुरुवात करत एका-एका गुणांसाठी दोघांत चुरस रंगली. एक वेळ ही लढत ३-३ अशी बरोबरीत सुरू होती. अखेर सागरने आपल्या आक्रमक डावाच्या जोरावर महेश मोहोळवर वर्चस्व राखत लढत ८-२ अशी जिंकली.

दुसरीकडे पुण्याच्या सचिन येलभरने कल्याणच्या गणेश भोईरचा १०-० असा सहज पराभव केला. कोल्हापूर शहरच्या महेश वरूटेने रत्नागिरीच्या दयानंद पाटीलवर असे एकतर्फी हरवले.

विजयची विजयी सलामी
माती विभागात जळगावचा डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आखाड्यात उतरला. तिसरे विजेतेपदाचे लक्ष्य असलेल्या विजयने कोल्हापूरच्या सचिन जामदारला ३-० ने सहज पराभूत करत आपण यंदाचेही दावेदार असल्याचे सिद्ध केले. चाहत्यांनी विजय मैदानात उतरताच एकच जल्लोष करत त्याचे स्वागत केले. दुसरीकडे लातूरच्या ज्ञानेश्वर गोचडीने धुळ्याच्या राहुल चौधरीवर मात केली.
बातम्या आणखी आहेत...