आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Third Human Milk Bank Starts In Pune At Sasoon Hospital

मातृदुधाची तिसरी पेढी पुण्याच्या ससून रुग्णालयात सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मानवी दुधाची पेढी (ह्युमन मिल्क बँक) ससून रुग्णालयात नुकतीच सुरू झाली. बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने 15 लाख रुपये खर्चून उभारलेल्या या पेढीचे काम निधीअभावी 5 वर्षे रखडले होते.पुण्यातील या तिस-या दूधपेढीच्या उद्घाटनास खासदार सुप्रिया सुळे, बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ‘ससून’च्या बालरोग विभागप्रमुख डॉ. संध्या खडसे आदी उपस्थित होते. देशातल्या मानवी दूधपेढ्यांची संख्या 14 असून यातील पाच मुंबईत, तर तीन पुण्यात आहेत. पुण्यातील पहिली मानवी दूधपेढी 2011 मध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सुरू झाली. ‘मंगेशकर’मधील दूधपेढीचा लाभ आतापर्यंत सातशेहून अधिक नवजात बाळांना झाला आहे.
‘मातेच्या दुधामुळे दमा, कर्करोग, संधिवात हृदयरोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. मधुमेहाची शक्यता 34 टक्क्यांनी कमी होते. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बाळाला स्तनपान आवश्यक आहे,’ असे डॉ. चंदनवाले म्हणाले. पहिल्या टप्प्यात वीस बालकांना या पेढीतून दूध उपलब्ध करून दिले जाईल, असे डॉ. खडसे म्हणाल्या.
संकलन होते कसे?
एड्स, कावीळ, इतर संसर्गजन्य रोग नसलेल्या निरोगी मातांचे अतिरिक्त दूध (सरप्लस मिल्क) पेढीसाठी घेतले जाते. इलेक्ट्रॉनिक ब्रेस्ट पंपच्या साह्याने दूध काढले जाते. वेदनारहित आणि सुरक्षित पद्धतीने काढलेल्या या दुधाला संसर्गाचा धोका असतो. पाश्चरायझर मशीनमध्ये मातेचे दूध संकलित केले जाते. 62.5 डिग्री सेल्सिअस अंशाला तापवून हे दूध साठवले जाते. यामुळे दुधातील प्रोटीन व इतर जीवनसत्त्वे सुरक्षित राहतात. दूध तापवल्यानंतर त्यात अपायकारक जिवाणू व इतर जंतू असू नयेत या खबरदारीसाठी हे दूध सूक्ष्मजीवशास्त्र विभागातून तपासून घेतात. फ्रीजमध्ये संकलित केलेल्या दुधाचा पुरेपूर लाभ मिळण्यासाठी काढल्यापासून 96 तासांत बाळाला मिळणे गरजेचे असते. तसेच उणे वीस तापमानाला सहा महिन्यांपर्यंत हे दूध साठवता येते.
बालमृत्यू रोखणे शक्य
भारतात दर हजार नवजात बाळांपैकी 43 बाळांचा मृत्यू जन्मानंतरच्या पहिल्या महिन्यात होतो, तर जन्मल्यानंतर मृत्यू पावणा-या बालकांची संख्या हजारामागे 47 इतकी आहे. हे मृत्यू कमी करण्यासाठी मानवी दूधपेढ्या उपयोगी ठरणार आहेत.
फायदा कोणाला?
* आजारपण, कमी वजन, बाळंतपणातील अडचणी, दुर्धर रोग आदींमुळे मातांना दूध नसते वा अपुरे दूध येते.
* प्रसूतीदरम्यान मृत्यू झालेल्या मातांच्या बाळांना किंवा अपु-या दिवसांच्या बाळांना आईचे दूध मिळत नाही.
* जुळं, तिळं होणा-या मातांना दूध कमी पडते.
* किरकोळ शरीरयष्टी, अशक्त प्रकृती, सपाट स्तन, स्तनाग्रांमधले दोष आदी कारणांमुळे काही मातांना पुरेसे दूध येत नाही.