आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thopate Defeated Ajitdata In Pune District Local Election

थोपटेंनी चारली अजितदादांना धूळ, राष्‍ट्रवादीचा पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शरद पवार यांनाही ज्येष्ठ असणारे कॉँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे यांनी भोर (जि. पुणे) नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धूळ चारली, तर कॉँग्रेसचे मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही स्वत:च्या गावातील सत्तेवर निर्विवाद वर्चस्व राखत ‘राष्ट्रवादी’चा दारुण पराभव केला.


जिल्ह्यातील एका पालिकेसाठी आणि 30 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी निकाल जाहीर झाले. ‘राष्ट्रवादी’मय पुणे जिल्ह्यातील भोर आणि इंदापूर या दोनच तालुक्यांमध्ये कॉँग्रेस वर्चस्व टिकवून आहे. या तालुक्यांमध्ये कॉँग्रेसला पराभूत करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न या वेळीही यशस्वी झाला नाही.


अजित पवार यांनी भोर नगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कार्यकर्त्यांना सर्वतोपरी ‘बळ’ दिले होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पवारांनी भोरमध्ये सभा घेऊन अनंतराव थोपटे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘म्हाता-या लोकांना घालवा एकदाचे,’ अशा आशयाची टीकाही केली होती. ही टीका थोपटे यांना चांगलीच झोंबली. त्यांनीही अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत जशास तसे प्रत्युत्तर दिले. ‘ज्येष्ठांचा आदर ठेवायला शिका,’ असा सल्ला देत थोपटेंनी शरद पवारांनाही लक्ष्य केले होते. या निवडणुकीत थोपटे यांनी 17 पैकी 13 जागा जिंकत अजित पवारांवर सपशेल मात केली.


कॉँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनीही बावडा (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीमधली सत्ता एकहाती राखली. येथील 17 पैकी फक्त एक जागा ‘राष्ट्रवादी’ला मिळाली.


खासदार सुप्रिया सुळेंचा डाव ‘वेगळा’
अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम हे भोरचे आमदार आहेत. थोपटेंचा विधानसभेचा मतदारसंघ सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो. भोर पालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवार जिवाचे रान करत असताना सुळे मात्र या निवडणुकीच्या रणधुमाळीपासून जाणीवपूर्वक दूर राहिल्या. एवढेच नव्हे तर निवडणूक काळात थोपटे यांची भेट घेत त्यांनी योग्य तो ‘संदेश’ही दिला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच 2014 च्या निवडणुकीतही थोपटे यांचे सहकार्य कायम राहण्यासाठी सुळे यांनी ‘वेगळा’ डाव खेळल्याचे सांगितले जात आहे.