आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा सेनेच्या प्रमुखावर शिवसेनेच्याच पदाधिका-याकडून राजकीय वैमनस्यातून हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील वडगाव शेरी परिसरात दोन दिवसापूर्वी युवा सेनेचे शहराध्यक्ष नितीन गोविंद भुजबळ (वय 22, रा. वडगाव शेरी) यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी येरवडा पोलिसांनी आज तिघांना अटक केली आहे. राजकीय व व्यावसायिक वादातून भुजबळ यांच्यावर हल्ला झाल्याचे तपासात पुढे आले आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये शिवसेनेच्याच एका पदाधिका-याचा समावेश असून त्याचे नाव प्रदीप ढोकले असे नाव आहे. प्रदीप ढोकले हा माजी शाखाप्रमुख आहे. भुजबळ याच्यामुळेच आपले शाखाप्रमुख पद गेले असे त्याचे म्हणणे होते. याच रागातून त्याने हल्ला केल्याचे तपासात पुढे आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या प्रदीपचे इनऑरबिट मॉलमध्ये एक कॅंटीन शॉप होते. मात्र भुजबळ याने पालिकेकडे तक्रार केल्याने प्रदीपचे कॅंटीन बंद करावे लागले. कॅंटीन बंद पाडल्यामुळे प्रदीपने चिडून भुजबळ यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे हा हल्ला राजकीय वैमनस्यातून व व्यावसायिक वादातून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील आणि निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे यांच्या पथकाने सुरू केला होता.
वडगाव शेरी परिसरात बुधवारी सकाळी भुजबळ यांच्यावर अज्ञात दोघांनी हल्ला केला होता. भुजबळ हे मोटारीतून चालक सुनील याच्यासोबत चालले होते. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी मोटार अडवून भुजबळ यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, वडगाव शेरी येथील शिवसैनिकांनी पोलिस उपायुक्त पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.