आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thunder Rain In Nashik, State's Other Part Tempeture Increases

नाशकात गारांचा पाऊस, राज्यात इतरत्र तापमानात वाढ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/नाशिक - राज्यातील थंडी गायब होऊ लागली असून अनेक गावांमधला पारा 35 अंश सेल्सियसचा आकडा ओलांडू लागला आहे. कोकण किनारपट्टीवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि वाढलेल्या तापमानामुळे सोमवारी नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार, नगर जिल्ह्यात पावसाची नोंद झाली.

पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले की, येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकोळ सरींची शक्यता आहे. या भागातील अनेक गावांमध्ये ढगाळ हवामान असेल. राज्यात कोठेही थंडीची लाट येण्याची चिन्हे नाहीत. लक्षद्वीपपासून दक्षिण कोकणपर्यंतच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. यामुळे भूभागावर बाष्प वाहून येत आहे. भूभागाचे तापमान वाढू लागल्याने तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक 36.3 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. सर्वात कमी तापमानाची नोंद मालेगाव येथे 14.2 अंश इतकी झाली. जळगावव्यतिरिक्त मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही तापमान वाढले आहे.

द्राक्ष बागांचे नुकसान
नाशिकसह जिल्ह्यात काही ठिकाणी सोमवारी दुपारनंतर गारांचा पाऊस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. नाशिकमध्ये 4 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नाशिकसह सुकेणे, पिंपळगाव, देवळा, साकोरे, कोकणगाव, चिंचखेड, आडगाव, नांदूरमध्ये पावसामुळे द्राक्ष, कांदा, डाळिंब व बेदाण्याचे नुकसान झाले. ढगाळ हवामानामुळे द्राक्षांवरील भुरी धुतली जाईल. परंतु, पावसामुळे द्राक्षमण्यांच्या नुकसानीची शक्यता आहे.