पुणे - राज्य कापूस महासंघाकडून कापूस खरेदी करण्यास नाफेडने असमर्थता व्यक्त केल्याने कापूस उत्पादक शेतक-यांसमोर मोठे संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने वेळीच लक्ष देऊन कापूस खरेदीचे सरकारी धोरण पूर्ववत चालू न ठेवल्यास शेतक-यांना गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल. विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादकांना किमान गेल्या वर्षीइतकाच भाव मिळेल, याची काळजी सरकारने घ्यावी, अशी सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे.
साखरेच्या किमतीमध्ये आलेल्या मंदीमुळे साखर कारखान्यांना उसाची किफायतशीर किंमत (एफआरपी) देण्यात अडचणी येत आहेत. ऊस उत्पादकांना योग्य किंमत देण्याची स्थिती कारखानदारांकडे राहिलेली नाही, याकडे पवारांनी लक्ष वेधले. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने ऊस-कापसाच्या प्रश्नांकडे ते गांभीर्याने पाहतील, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने कापसाला प्रति क्विंटल ४०५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. राज्यातील कापूस खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी राज्य सरकारच्या वतीने जाहीर केले आहे. मात्र, कापसाच्या किमती सध्या प्रति क्विंटल ३९०० ते ४००० हजार रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. या स्थितीत नाफेडने कापूस खरेदी न केल्यास कापूस दराचा प्रश्न व्यापा-यांच्या हातात जाईल. राज्य सरकारने यात वेळीच हस्तक्षेप केला पाहिजे, असे पवार म्हणाले.
ऊस दरासाठी संघर्ष करणारे आता केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या मागण्या लवकर पूर्ण होतील, असा टोला पवारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता लगावला. पवार म्हणाले, "गेल्या हंगामात साखरेच्या किमती पडल्या तेव्हा पूर्वीच्या सरकारने महाराष्ट्रातील कारखान्यांना दोन हजार कोटी उपलब्ध करून दिले. त्यामुळे कारखाने शेतक-यांना भाव देऊ शकले. यंदाच्या सरकारने
साखरेचे निर्यात अनुदानसुद्धा बंद केले आहे. एफआरपी देण्यासाठी कुठलीही तरतूद सरकारने केलेली नाही.'
केंद्राने नाफेडला अर्थसाह्य करावे
*कापूस खरेदीसाठी केंद्राने नाफेडला अर्थसाह्य करावे.
*कापूस महासंघाला खरेदीसाठी बँक गॅंरटी द्यावी.
*गेल्या वर्षीप्रमाणे प्रति क्विंटल पाच हजार रुपये भाव कापसाला मिळेल, याची हमी सरकारने घ्यावी.
*एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे.
पवारांचे गाव ‘एनकुले'
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराने
आपल्या मतदारसंघातील एक गाव विकासासाठी निवडावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार मी एनकुले (ता. खटाव, जि. सातारा) गावाची निवड केली आहे. या गावाविषयी काही जवळीक आहे का, या प्रश्नावर पवार म्हणाले, "माझ्या जुन्या माढा मतदारसंघातील हे गाव आहे. मी त्या गावात कधीही गेलो नाही; पण या गावातून मला ९४ टक्के मतदान झाले होते. मला एवढी मते देणारे विचारवंत कोण आहेत, हे पाहावे म्हणून मी या गावाची निवड केली. "राष्ट्रवादी'चे राज्यसभेतील खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी मुर्टी (ता. बारामती) आणि अॅड. माजिद मेनन यांनी ठिकेकंदवाडी (ता. जुन्नर) या गावांची निवड केल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.