आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Break Alliance With Nationalist, Stand Election Own Strength

राष्‍ट्रवादीशी आघाडी तोडा; स्वबळावर निवडणूक लढा, कार्यकर्त्यांचे राहुल यांना साकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाली असून येत्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात, अशी आग्रही मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी पक्षाचे राष्‍ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली. अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अधिक जागा निवडून आल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्धची जनतेतील नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी’शी आघाडी न करणेच काँग्रेसच्या हिताचे असल्याची विनंती गांधी यांच्याकडे करण्यात आली.


कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नगर धुळे, नंदूरबार तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमधील कॉँग्रेस पदाधिका-यांशी राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यात स्वतंत्रपणे चर्चा केली. या वेळी कार्यकर्त्यांनी स्वबळाचा राग आळवला. सर्वच जिल्ह्यांमधून आलेल्या या मागणीवर गांधी यांनी सांगितले, ‘दिल्लीमध्ये स्वबळावर आपले सरकार येत नसल्याने देशभरात अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्षांबरोबर जावे लागते. कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणल्या तर अशा आघाड्या करण्याची गरजच भासणार नाही. त्या मुळे पक्षाची ताकद वाढवण्याचे प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावेत’, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसशी युती तोडण्यासंबंधी मात्र राहुल यांनी काहीही भाष्य केले नाही.


दगाफटका केल्यास गय नाही
‘लोकसभेत 272 जागांपर्यंत कॉँग्रेस पोचली तर इतर पक्षांशी आघाडी करावी लागणार नाही. अपरिहार्यतेमुळे आघाडी करावी लागते. ही स्थिती बदलण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद दूर ठेवून एकत्र यायला हवे. मी नुकताच मध्य प्रदेशात जाऊन आलो. या राज्यातील संघटनेची स्थिती चांगली असल्याचे दिसून आले. पक्षाला दगाफटका करणा-या कार्यकर्त्यांची गय केली जाणार नाही. पक्षहिताला घातक ठरणा-या काँग्रेसजनांना लक्षात राहण्याजोगी अद्दल घडवली जाईल,’ असा इशाराही गांधी यांनी दिला.


‘बारामती’ची मागणी
शरद पवार दीर्घकाळ निवडून येत असलेला आणि गेल्या टर्मपासून सुप्रिया सुळे खासदार असलेला बारामती मतदारसंघ कॉँग्रेसने ताब्यात घ्यावा, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. ‘या मतदारसंघात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे. प्रत्येकी दोन आमदार कॉँग्रेस व युतीचे आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या मतदारसंघात कॉँग्रेसला भरघोस यश मिळाले असल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा उमेदवार उभा करावा,’ असे पुणे जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी यांनी राहुल यांना सांगितले.


नेते बाहेर; कार्यकर्ते आत
सकाळी नऊ ते दुपारी पावणेचारपर्यंत सलगपणे राहुल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी काँग्रेसचे मंत्री, आमदार यांच्यापेक्षा पक्षाच्या पदाधिका-यांना बोलण्यास परवानगी दिली. जिल्हावार बैठका होत असताना मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह सर्व मंत्र्यांना त्यांनी दालनाबाहेर ठेवले होते. राहुल यांचे सहायक कार्यकर्त्यांच्या सूचना आणि मनोगत लॅपटॉपवर नोंदवून घेत होते.