आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच कोटी तंबाखूप्रेमी कॅन्सरच्या दारात. दरवर्षी 8 लाख लोकांचा राज्यात जातो बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्रातील तब्बल दोन कोटी साठ लाखांहून अधिक लोकांना बिडी किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आहे. हे लोक घसा आणि तोंडाच्या कर्करोगाचे (कॅन्सर) बळी ठरू शकतात. कर्करोगामुळे राज्यात दरवर्षी आठ लाख लोकांचा मृत्यू होतो, हे वास्तव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पाहणीतून पुढे आले आहे.
केवळ तंबाखूमुळे घसा आणि तोंडाचा कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग असलेल्यांची संख्या जास्त आहे. देशातल्या एकूण कर्करोगग्रस्तांपैकी 40 टक्के रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन होते, अशी माहिती व्हॉइस ऑफ टोबॅको व्हिक्टिम्स (व्हीओटीव्ही) संघटनेचे राज्याचे प्रमुख डॉ. विनोद गोरे यांनी दिली.
वैद्यकीय परिभाषेत तंबाखूला ‘नंबर वन किलर’ असे संबोधले जाते. जगाच्या पाठीवर दर तीस सेकंदांनी एक माणूस तंबाखूजन्य पदार्थांमुळे झालेल्या रोगांमुळे मृत्युमुखी पडतो. तंबाखूजन्य रोगांचे सर्वाधिक प्रमाण भारतामध्ये आहे. मिझोराम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तंबाखूचे व्यसन असलेल्या दहा लाख लोकांना दरवर्षी नव्याने कर्करोगाची लागण होत असल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले.

केंद्राकडून तंबाखूजन्य पदार्थांवरील निर्बंधाबाबत कडक पावले उचलली जाण्याची अपेक्षा असून नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदीही ही व्यसनाधिनता दूर करण्यासाठी अनुकूल असल्याचे डॉ. गोरे म्हणाले.

तंबाखूवरील व्हॅट वाढवा
‘व्हीओटीव्ही’चे देशाचे प्रमुख डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेतली. या वेळी त्यांनी विडीसह सर्व तंबाखूजन्य पदार्थांवरील व्हॅट 65 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली. तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन व विक्रीवर कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात चर्चा केली. केंद्राने तंबाखूचा समावेश ‘अन्नपदार्थां’च्या यादीत केला आहे. तंबाखूला दिलेला अन्नाचा दर्जा काढण्याची विनंती डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आली आहे.

कॅन्सर रुग्णालयात ‘वेटिंग’
‘गुटखा, तंबाखू, विडी आदींमुळे तोंड व घशाचा कर्करोग होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. रुग्णांची संख्या इतकी प्रचंड आहे की त्यांच्यावर उपचार करणारी रुग्णालयेही अपुरी पडत आहेत. देशात प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कर्करोगावरील शस्त्रक्रियेसाठी तीन महिन्यांची वेटिंग लिस्ट आहे,’ अशी माहिती डॉ. विनोद गोरे यांनी दिली.