आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आज ठरणार, ९० टक्क्यांहून अधिक विक्रमी मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - घुमान येथे होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी यंदा विक्रमी मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी येथे दिली. १०७० पैकी १०२० मतदारांनी हक्क बजावल्याने मतदानाने प्रथमच ९० टक्क्यांचा विक्रमी आकडा गाठला. मतपत्रिका पाठवण्याचा मंगळवार (९ डिसेंबर, सायंकाळी ७) हा अंतिम दिनांक होता.

पुढील वर्षी पंजाबमधील घुमान येथे एप्रिल महिन्यात साहित्य संमेलन होणार आहे. संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. अध्यक्षपदासाठी यंदा चौरंगी लढत आहे. डॉ. सदानंद मोरे, डॉ. अशोक कामत, पुरुषोत्तम नागपुरे आणि भारत सासणे हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या निवडणूक प्रक्रियेत एकूण १०७० मतदारांना मतपत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. अंतिम मुदतीत म्हणजे मंगळवारपर्यंत त्यापैकी १०२० मतदारांनी मतदान केल्याची नोंद आहे, असे आडकर म्हणाले. सोमवारी ६६० मतपत्रिका आल्या होत्या. मंगळवारी अखेरच्या दिवशी आणखी ३६० मतपत्रिकांची नोंद झाली. दरम्यान, या संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौघांमध्ये चुरस
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीची मतमोजणी बुधवारी सकाळी साडेनऊपासून साहित्य महामंडळाच्या कार्यालयात सुरू होणार आहे. दुपारी बाराच्या सुमारास निकाल लागण्याची शक्यता आहे, असे प्रमोद आडकर यांनी स्पष्ट केले.