आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: वयाच्या 18 व्या वर्षीच पुण्यातील अपेक्षा \'टॉलीवूड\'ची अभिनेत्री!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री अपेक्षा पांचाळ - Divya Marathi
अभिनेत्री अपेक्षा पांचाळ
पुणे- शुटिंग बघायला गेली अन् हिरोईन झाली... ही कल्पनाच किती रम्य आहे. पण ही कल्पना सत्यात उतरवली आहे, आळंदीच्या अपेक्षा पांचाळ या 18 वर्षीय तरूणीने. वडिलांचा अभिनय बघायला गेलेल्या अपेक्षाला चक्क तमिळ चित्रपटात थेट प्रमुख अभिनेत्री म्हणून भुमिका करण्याची संधी मिळाली. तमिळ चित्रपटसृष्टीत सर्वात कमी वयाची अभिनेत्री होण्याचा मानही आपसूकच अपेक्षाच्या नावावर नोंदवला गेला. सांप्रदायिक वातावरणात वाढलेल्या अपेक्षाला वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षातच तमिळ, कन्नडसह मराठी चित्रपटात 'ऑफर' येऊ लागल्या आहेत, ते ही पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच हे विशेष.
अपेक्षाचे वडिल आप्पा पांचाळ हे वारकरी सांप्रदयात मानाचे स्थान असलेल्या गवळण म्हणण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अपेक्षाचे वडिल आप्पा पांचाळ यांच्या अनेक गवळणी ध्वनीमुद्रीत झाल्या आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्ठीशी त्यांची थोडीफार ओळख आहे. कलाकार असल्याने ते ही छोट्या-मोठ्या भूमिका करतात. काही महिन्यापूर्वी वडिल काम करीत असलेल्या 'दहावीची ऐशी की तैशी' या चित्रपटाचे शुटिंग पाहायला अपेक्षा गेली होती. तेव्हा तेथे काही दक्षिण भारतीय दिग्दर्शक व निर्माते उपस्थित होते. आप्पा पांचाळ यांची मुलगी असल्याचे कळल्यानंतर दक्षिणेकडील एका निर्मात्याने तिला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. मात्र, मराठीशिवाय कोणतेही भाषा येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर दिग्दर्शक क्रांतीप्रसाद यांनी मेहनत व कष्ट घेण्याची तयारी असेल तर भाषेचा प्रश्न सोडवण्याची तयारी दाखवली. अपेक्षानेही आव्हान स्वीकारले.
वडिल आप्पा पांचाळ, आई महानंदा, तर दोन भाऊ रवी व अविनाश असा हा संपूर्ण पांचाळ परिवारच कलाकारमय असल्याने अपेक्षाचा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर क्रांतीप्रसाद यांनी सुरुवातीला तिला बेसिक तमिळ भाषेचे धडे दिले. या काळात अपेक्षाने तमिळ शिकण्यासाठी आठ-आठ तास कष्ट घेतले. त्यानंतर क्रांतीप्रसाद यांनी तिला चेन्नईतील क्रांती अकादमीत नेले. तेथे तमिळ चित्रपटाला आवश्यक नृत्य अभिनयाबरोबर कन्नड, तमिळ, उर्दू भाषा शिकण्यास सुरुवात केली. अवघ्या तीन महिन्यात अपेक्षाने तमिळ भाषेवर प्रभुत्व मिळवले. त्यामुळे अभिनय करणेही सोपे झाले. अपेक्षाने घेतलेल्या मेहनतीनंतर अखेर तिला पहिला तमिळ चित्रपट 'संतोषीथिल कलावरम' तोही वयाच्या अवघ्या 18 व्या मिळाला. या चित्रपटात तिला प्रमुख अभिनेत्री म्हणून तर, मुख्य नायक म्हणून कन्नडमधील निरंत रेड्डीला संधी मिळाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे जीवन व त्यांच्यातील मैत्रीवर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटात तिची आई महानंदा यांचीही छोटीशी भूमिका आहे. त्यामुळे अपेक्षाला शुटिंगदरम्यान कोणतेही दडपण जाणवले नाही.
वारकरी सांप्रदयाचे संस्कार झालेल्या व मराठमोळ्या वातावरणात लहानाची मोठी झालेली आळंदीची सुकन्या अपेक्षाने अखेर टॉलीवूडमध्ये झेप घेतली. तमिळ चित्रपटसृष्टीत सर्वात लहान वयाची अभिनेत्री होण्याचा बहुमान तिच्या नावावर नोंद झाला आहे. केवळ मराठीच भाषा येत असतानाही तिने तमिळ चित्रपटात काम करण्याची तयारी दाखवली. शूटिंग बघायला गेली अन् हिरोईन झाली ही कल्पनाच अपेक्षाला एकदम स्वप्नवत वाटत आहे. पुढील दोन-तीन महिन्यात तिचा पहिला तमिळ चित्रपट 'संतोषीथिल कलावरम' प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच तिला मराठी व हिंदी चित्रपटातून ऑफर येऊ लागल्या आहेत. पण चांगल्या बॅनरचा मराठी चित्रपट असेल तर काम करणार असल्याचे अपेक्षाने सांगितले.
आळंदीतील नगरपरिषदेच्या शाळेत अपेक्षाने प्राथमिक शिक्षण घेतले. अपेक्षा यंदा 12 वी पास झाली आहे. आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात वाणिज्य विभागात शिकणा-या अपेक्षाला यावर्षी 12 वीच्या परीक्षेत 72 टक्के गुण मिळाले आहेत. वारकरी सांप्रदयाच्या संस्कारात वाढलेल्या अपेक्षाचे नशिबच पालटले आहे. तमिळ चित्रपटात काम करण्याआधी तिला भाषेची अडचण वाटली. पण दिग्दर्शक क्रांतीप्रसाद यांनी स्वतः तिला अभिनय व भाषेचे धडे दिल्यानंतर तिच्यात कमालीचा बदल झाला. ज्या भाषेचे तिला दडपण होते नंतर त्याच भाषेत काम करताना तिच्या मनातील भीती नष्ट होऊन प्रचंड उत्सुकता वाटू लागली. 'संतोषीथिल कलावरम' या तमिळ चित्रपटानंतर तिला रणजीव नावाचा तेलगू व एका कन्नड चित्रपटाची ऑफर मिळाली आहे.
पुढे स्लाईडसच्या माध्यमातून पाहा, अभिनेत्री अपेक्षा पांचाळचे PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...