पुणे - केवळ 38 मिनिटांमध्ये तब्बल एक लाख 861 रुग्णांवर उपचार करणा-या आरोग्य शिबिराची नोंद थेट गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्याचा विक्रम रविवारी घडला. रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नेरूळ येथे आयोजित हे आरोग्य शिबिर गिनीज बुकात नोंदवण्यात आले.
यासंदर्भात गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी जॅक बोर्डबॅक म्हणाले, इतक्या प्रचंड संख्येने एका आरोग्य शिबिरासाठी एका ठिकाणी रुग्ण येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. तसेच हे उपचार व तपासण्या कमीत कमी वेळात केल्या जाणार आहेत. त्यामुळे या आरोग्य शिबिराची नोंद आम्ही घेत आहोत. प्रस्तुत शिबिरासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्यासह ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, डी. वाय. पाटील कॉलेजचे कुलगुरू डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.
महाकाय आरोग्य शिबिर
* 16 विभाग रुग्णांच्या नोंदणीसाठी
* 1200 वैद्यकीय तज्ज्ञांचा सहभाग
* 500 आरोग्य व वैद्यकीय मदतनिसांचा ताफा प्रचंड प्रमाणात औषधांचा साठा
* 1.52 लाख रुग्णांची दिवसभरात तपासणी