आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बोलीभाषेतही पुस्तके येणार, शिक्षण आयुक्तांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचावा यासाठी त्यांना समजणाऱ्या बोलीभाषेतील पुस्तके तयार करण्यात येत आहेत. विशेषत: आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी बोलीभाषांतील द्वैभाषिक पुस्तके तयार केली जाणार आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (विद्या परिषद) सोपवण्यात आली आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी ही माहिती दिली. भापकर म्हणाले, ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील आदिवासी क्षेत्रात १६ बोलीभाषांचा वापर प्रामुख्याने केला जातो. त्यापैकी १० बोलीभाषांमध्ये आदिवासी मुलांसाठी व त्यांच्या शिक्षकांसाठी पुस्तके तयार केली जाणार आहेत. यातून आदिवासी मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल आणि त्यांची शिक्षणप्रक्रियेतील गळती थांबून शिक्षणात सातत्य येण्यास मदत होईल. बोलीभाषेत पुस्तके मिळाल्यावर भाषेची गोडी वाढेल, विषय समजेल आणि आकलनही सुधारेल.’
द्विभाषिक पुस्तके
आदिवासी मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांना मूळ शब्द आणि बोलीभाषेतील शब्द, यांचे नाते माहिती व्हावे, मुलांशी त्यांच्या भाषेत संवाद साधता यावा यासाठी द्विभाषिक पुस्तकेही तयार केली जाणार आहेत. ‘शैक्षणिक संदर्भ पुस्तके’ असे त्यांचे स्वरूप असेल. राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेकडे या पुस्तकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिक्षण प्रक्रिया सुगम होईल
प्रमाणित मराठी भाषेतून अभ्यासक्रमातील संकल्पना समजून घेणे अवघड वाटू शकते. त्याऐवजी नित्य परिचयाच्या बोलीभाषेतील पुस्तके मिळाल्यास शिक्षण प्रक्रिया सुगम होईल. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा गट या उपक्रमात समाविष्ट केला जाईल. - डॉ. पुरुषोत्तम भापकर