पुणे - उस्मानाबाद येथून पुण्यात गोमांस विक्रीसाठी आलेला टेम्पो पोलिसांनी रविवारी पकडला. याप्रकरणी टेम्पोचालक कलिमा अब्दुल कादर पालकर, क्लीनर हाजी हारुण शेख (दोघेही रा. पुणे), जुबेर कुरेशी, सलमान कुरेशी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा (सुधारित) कलम ५ (क) ९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
कृषी गोसेवा संघाने हा प्रकार उघडकीस अाणला. संघाचे सदस्य व मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील कसाई मोहल्ल्यात १२ गायी व वासरांची कत्तल करून ते मांस पुण्यात कोंढवा येथील जुबेर कुरेशी, सलमान कुरेशी यांच्या दुकानात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शिवशंकर यांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटेपासून गोरक्षकांनी चंदननगर – खराडी येथे सापळा रचून टेम्पो पकडला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यांनी तपासणी करून टेंपोत गोमांस असल्याचे सांगितले.