आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Twele Examination : Director If Object On Centre Then Action Take Jadhav

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारावी परीक्षा : परीक्षा केंद्रांबाबत संस्थाचालकांनी हरकत घेतल्यास कारवाई - जाधव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारावीच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या इमारती परीक्षा केंद्र म्हणून वापरण्यास खासगी शिक्षण संस्थाचालकांनी हरकत घेतली, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने परीक्षा केंद्रे न देण्याचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले, आंदोलनासंदर्भातील महामंडळाची बैठक सोमवारी झाली. त्यात अध्यक्षांना आंदोलनाबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देण्याचा ठराव झाला. महामंडळाच्या काही मागण्यांना शासनाकडून
सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि उर्वरीत मागण्यांविषयी बैठक घेऊन चर्चा करण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून निरोप आल्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

परीक्षा वेळापत्रकानुसारच
खासगी शिक्षण संस्थाचालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी बारावी परीक्षेसाठी शिक्षण मंडळाला आपल्या इमारती न देण्याचा निर्णय घेतला होता. त्याविषयी विचारणा केल्यावर जाधव यांनी सांगितले, अशी वेळ येणार नाही, मात्र ती आल्यास तातडीने संबंधित जिल्हाधिका-यांमार्फत कारवाईचे आदेश काढले जातील. परीक्षेच्या दिवसात काही संस्थाचालकांनी घेतलेल्या या अडवणुकीच्या भूमिकेवर जाधव यांनी टीका केली. मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा पार पडतील, असे ते म्हणाले.

शिक्षण मंडळाचा यंदा राज्यात प्रथमच प्रयोग
राज्यभरात निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रांवरच बारावीच्या परीक्षा घेतल्या जातील. त्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत, असा दावा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदा प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या धर्तीवर विशेष नियंत्रणकक्ष स्थापन करण्यात येत असून, कुठेही अडचण निर्माण झाल्यास त्याचे त्वरित निराकरण करणे त्यामुळे शक्य होणार आहे, अशी माहितीही सर्जेराव जाधव यांनी दिली.