आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस वर्षांपूर्वी होत होते 75 % स्थलांतर, आता पूर्ण थांबले;जलसंधारण ते कुरण शेती ते कृषी पर्यटनाने मोराची चिंचोलीत किमया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोराची चिंचोली परिसरातील सर्व गावांत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात असे चारा पीक घेतात. - Divya Marathi
मोराची चिंचोली परिसरातील सर्व गावांत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात असे चारा पीक घेतात.
मोराची चिंचोली (जि. पुणे) - मोराची चिंचोली औरंगाबाद-पुणे राज्य महामार्गावरील शिरूरपासून २५ किलोमीटर अंतरावरील गाव. वीस वर्षांपूर्वी गावात कायम पाण्याची टंचाई. गावाजवळून वाहणारी कामिनी नदी पावसाळ्यात भरून वाहायची. मात्र वर्षाच्या उर्वरित आठ महिने पाण्याचा ठणठणाट. त्यामुळे गावाची अर्थव्यवस्था बिकट. ३५०० लोकसंख्या असलेल्या मोराची चिंचाेलीचे ७५ टक्के लोक मुंबई -पुण्यात रोजगारासाठी स्थलांतरित झाले. वीस वर्षांपूर्वी जलसंधारणाची कामे करण्याचे गावाने ठरवले. त्यानुसार गावाच्या आजूबाजूच्या डोंगरावर माथा ते पायथा जलसंधारणाची कामे झाली. नदीवर ठिकठिकाणी बंधारे, बांध घालण्यात आले. संपूर्ण डोंगरावर, शेतात कुरणाची शेती घेण्यात आली. आज गावातील १२०० एकराहून जास्त क्षेत्रावर विविध प्रकारचे गवत घेतले जाते. येथे सध्या तीन ते ४ हजारांवर मोर आहेत. याचा फायदा घेत गावात आता कृषी पर्यटनाने वेग घेतला आहे. येथे सध्या १० कृषी पर्यटन केंद्रे आहेत. सध्या वर्षाकाठी विविध शैक्षणिक सहली, देश-विदेशातील ३० ते ४० हजार पर्यटक भेट देतात. गावाने जलसंधारणातून कुरण शेती व कृषी पर्यटनाच्या माध्यमातून किमया साधली आहे. यातून मोराची चिंचोली गावात आर्थिक सुबत्ता आली असून स्थलांतरित ग्रामस्थ पुन्हा येथे आले आहेत. भारत पर्यटन महामंडळ तसेच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने मोराची चिंचोलीला विविध पुरस्काराने गौरवले आहे. गवताच्या शेती ते कृषी पर्यटनामुळे मोराची चिंचोलीची कीर्ती देशात नव्हे तर विदेशातही पोहोचली आहे. 
 
मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे सर्वेसर्वा अॅड. देवराम गोरडे यांनी सांगितले, आमचे गाव तसे दुष्काळी पट्ट्यात येणारे. पावसाळा सोडला तर गावात पाण्याचा कायमचा ठणठणाट असायचा. त्यावर उपाय म्हणून २० वर्षांपूर्वी जलसंधारण, मृदसंधारणाची कामे केली. आजूबाजूच्या डोंगरावर हेमोटो, स्टायलोसारख्या गवताची पेरणी केली. शेतातही लुसर्न, गजराज गवताची लागवड करण्यास सुरुवात केली. डोंगरावर पायथा ते माथा जलसंधारणाचे उपाय केले. कामिनी नदीच्या पात्रात बांध टाकले. त्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी थांबले, डोंगरावरील गवतामुळे जमिनीची धूप थांबली. नदीच्या काठावरील सुमारे १७५ ते २०० विहिरींची पाणीपातळी वाढली. पाण्याचा प्रश्न मिटला. मग शेतीत मिश्र पीक शेतीचा प्रयोग राबण्यास सुरुवात केली. त्यात भाजीपाला, गवत व चाऱ्याची पिके, धान्य पिके, रोकड पिके, फळपिके अशी आखणी केली. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या एक तरी  पीक लागते. याच शेतीला कुक्कुटपालन, पशुपालन अशा पूरक व्यवसायांची जोड गावातील प्रत्येक शेतकऱ्याने दिली आहे. पुणे आणि मुंबई बाजारपेठ जवळ असल्याने कांदा व बटाटा पिकाची लागवड वाढली. या सर्व प्रयत्नातून गावाची अर्थव्यवस्था एकदम सुरळीत झाली. २० वर्षांपूर्वी घरात जर चार माणसे असतील तर तीन माणसे पोटापाण्यासाठी स्थलांतर करायची असे चित्र होते. गावातील ७५ टक्के लोक स्थलांतरित झाले होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. केवळ मोठ्या हुद्द्यावरील सरकारी  नोकरीवरील माणसेच इतरत्र राहत आहेत. 
 
सर्वात यशस्वी कृषी पर्यटन मॉडेल
मोराची चिंचोली गावात नावाप्रमाणेच मोरांची संख्या ३ ते ४ हजारांवर आहे. मोर पाहण्यासाठी पर्यटक येथे येतात. याच पर्यटकांच्या राहण्याची, जेवणाची व मोर पाहण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने गावाला कृषी पर्यटनाची दिशा गवसली. सध्या गावात १० कृषी पर्यटन केंद्रे आहेत. अॅड. देवराम गोरडे सांगतात, कृषी पर्यटनाचे देशातील सर्वात यशस्वी मॉडेल म्हणून भारतीय पर्यटन महामंडाळाने गावाला गौरवले आहे.  देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकाला मोर व्यवस्थित पाहता यावेत तसेच ग्रामीण जीवनाचे दर्शन घडावे ही कृषी पर्यटनामागील मुख्य भूमिका आहे. पर्यटकांसाठी राहण्या-खाण्याच्या सोयीसह, बैलगाडी सफर, ट्रॅक्टर सवारी, उंट सवारीसह विविध पिकांची शेतातील लागवड आदी सुविधा येथे दिल्या जातात. दररोज सकाळी व सायंकाळी एक तास एका ठिकाणी बसून मोर पाहण्याची सोय येथे आहे. सध्या  वर्षाकाठी ३० ते ४० हजार पर्यटक येथे भेट देतात. यातून गावातील ८०० ते १००० जणांना प्रत्यक्ष ते अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध झाला आहे.
 
आकडे बोलतात
१२०० एकर क्षेत्र गवताखालील 
२५०० लिटर दररोजचे दूध संकलन
२० पोल्ट्री फार्म
१०० पॉली हाऊस   
१० कृषी पर्यटन केंद्रे
१००० कृषी पर्यटनामुळे रोजगार  
३०-४० हजार वर्षाकाठी येणारे पर्यटक
 
मुंबईहून गावाकडे परत आलो : १८ वर्षांपूर्वी कुटुंबाचे भागेना म्हणून गाव सोडले. मुंंबईत रिक्षा चालवली. २००६ मध्ये गावाकडे आलो. आता माझी स्वत:ची पिकअप व्हॅन आहे.
 - ज्ञानोबा नाणेकर (ग्रामस्थ)
 
पॉली हाऊस बाष्पीभवनावर उपाय
मोराची चिंचोली येथील शेतकरी ज्ञानोबा नाणेकर यांनी सांगितले, उन्हाळ्यात गावाचा परिसर कडक उन्हाने तापतो. बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. यावर उपाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पॉली हाऊस उभारले आहेत. पॉली हाऊसमधील नियंत्रित वातावरणात फुलशेती करण्याकडे कल आहे. 
 
मिश्र पीक शेतीचे अनोखे मॉडेल
अॅड. देवराम गोरडे यांनी सांगितले, माझ्याकडे २५ एकर शेती आहे. त्याचे मी प्रत्येकी पाच एकरचे पाच भाग पाडले. एका भागात गवत, एका भागात फळबागा, एका भागात भाजीपाला, एका भागात धान्य पिके, एक पॉली हाऊस व शेततळे अशी आखणी केली. आंब्याच्या पिकात गवताचे आंतरपीक घेतले. 
 
पूरक व्यवसायांची शेतीला जोड
मोराची चिंचाेलीच्या सरपंच रूपालीताई यांनी सांगितले, प्रत्येक शेतकरी लुसर्न, गजराजसारखी  चारा पिके घेतो. गावात साधारण २० ते २२ पोल्ट्री फार्म आहेत. दहा-बारा वर्षांपूर्वी गावात मोटारसायकल क्वचित दिसायची, आज प्रत्येकाकडे वाहन आहे.
बातम्या आणखी आहेत...