आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र-देवेंद्रची ‘टिवटिवाटा'त लागली चढाअाेढ!, फडणवीस यांचे दोन संदेश मोदींकडून ‘रिट्विट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्वाधिक ट्विट करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र नुकतेच पाहण्यास मिळाले. यात बाजी मारली ती अर्थातच मोदींनी. रात्रीच्या झोपेचा वेळ वगळायचा म्हटले तर तासाला किमान दोन या गतीने मोदींनी रोज ३५ वेळा ट्विट केलेय. फडणवीसांचा वेग त्यांच्यापेक्षा निम्मा आहे.

पंतप्रधान मोदी ९ एप्रिलपासून फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीस १३ एप्रिलपासून जर्मनी आणि स्वीडन या युरोपीय देशांच्या दौऱ्यावर होते. फडणवीस शुक्रवारी (ता. १७) सकाळी मुंबईत परतले. मोदी शनिवारी (ता. १८) मायदेशी येत अाहेत. चार दिवसांच्या परदेश दौऱ्यात फडणवीसांनी ६१ वेळा ‘टिवटिवाट' केला, तर मोदींनी ९ दिवसांत तब्बल ३१७ ‘ट्विट' केले आहेत. दोघांच्याही ‘टिवटिवाटा'त फोटो, व्हिडिओ आणि संदेशांचा समावेश आहे. भारतीयांचे महत्त्वाचे सण, महापुरुषांच्या जयंत्या तसेच क्रीडापटूंच्या कामगिरीवर भाष्य करण्यास दोघेही विसरलेेले नाहीत. तासगाव आणि वांद्र्यातील पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांचेही फडणवीस यांनी ट्विटरवरून अभिनंदन केले.

मोदी आणि फडणवीस युरोपात एकत्र आले होते. या वेळी फडणवीस यांनी केलेले दोन ‘ट्विट' मोदी यांनी स्वतःच्या अकाउंटवरून ‘रिट्विट' केले, ही बाब फडणवीसांना सुखावून गेली असणार. मोदींनी पंजाबी, तेलगू, आसामी आदी भारतीय भाषांचाही वापर ट्विटरवर केलेला आहे. फडणवीसांनी मात्र एकदाही मराठीचा वापर ट्विटसाठी केला नाही.

युराेपात वाजवला महाराष्ट्राचा डंका
फडणवीस यांनी युरोपात असताना महाराष्ट्राचा डंका वाजवला. "महाराष्ट्राची ५३ % लोकसंख्या २५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. या युवकांना टेक्नॉलॉजी माहिती आहे. भारतात होणाऱ्या एकूण गुंतवणुकीच्या ३० टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी सोडू नका,’ असे आवाहन फडणवीस यांनी ट्विटरवरून केले.

कौतुकाची दखल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘टाइम' मासिकातून मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. त्यावर "डियर ओबामा, युवर वर्ड््स आर टचिंग अँड इन्स्पायरिंग. थँक्स,’ या शब्दांत मोदींनी तत्काळ ट्विटरवरून अाभार मानले. मोदींचे हे ट्विट गेल्या पंधरवड्यात सर्वात लोकप्रिय ठरले आहे. ट्विटरवर ३ हजार ४२३ लोकांनी त्याला लाइक केले आहे, तर हे ट्विट ३०१३ लोकांनी ‘रिट्विट' केलेय.

दोघांचे ट्विटरप्रेम
‘पीएमओ इंडिया’ हे मोदी यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट आहे. २००९ पासून ते ‘नरेंद्र मोदी' या नावाने ट्विटरवर आहेत. पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी वैयक्तिक खाते सुरू ठेवले आहे. तर ‘सीएमओ महाराष्ट्र' या अधिकृत अकाउंटच्या माध्यमातून फडणवीस जनतेशी संपर्क ठेवतात. ‘देवेंद्र फडणवीस' या नावाने २०१० पासून त्यांचे वैयक्तिक अकाउंट अाहेच.