आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळ्यात किरकोळ घटनेतून दोन फेरीवाल्यांना जिवंत जाळले, एकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लोणावळ्यात किरकोळ घटनेतून रेल्वेत पाण्याची बॉटल विकणा-या दोन फेरीवाल्यांना जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेतील एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुस-यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. व्यवसाय स्पर्धेतून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे.
अतुलसिंग जगजितसिंग भदोरिया (वय- 20, रा. लोणावळा) या फेरीवाल्याचा मृत्यू झाला तर, सचिन प्रताप सिंग (वय- 22, रा. लोणावळा) हा गंभीररित्या भाजला आहे. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी अमित अजमेरसिंग भदोरिया याला अटक केली आहे. दुसरा आरोपी फरार आहे.
लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर भारतातील चार युवक लोणावळ्यातील बराकी चाळीत राहतात. हे सर्व जण रेल्वेत पाण्याच्या बॉटल विकून आपला उदरनिर्वाह करतात. दोन दिवसापूर्वी या चौघांत रेल्वेत पाणी विकण्यावरून भांडण किरकोळ वादावादी झाली.

किरकोळ वादावादीतून अमित भदोरिया याने हे भांडण वाढविले. अतूल भदोरिया व सचिनप्रताप सिंग हे आपल्या बराकी चाळीतील एका खोलीत झोपले असताना अमित भदोरिया व सनी विजयपाल सिंग याने त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. तसेच बाहेरून खोलीला कडी लावून, आता तुम्हाला कोण वाचवतो तेच पाहतो असे सांगून फरार झाले. या घटनेत अतूल भदोरिया व गंभीररित्या भाजला तर सचिन किरकोळ भाजला. या दोघांना लोणावळ्यात रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज उपचारादरम्यान अतूलचा मृत्यू झाला.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात जखमी सचिनप्रताप सिंग याने अमित व सनी याच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी अमित अजमेरसिंग भदोरिया याला अटक केली आहे. तर, दुसरा आरोपी सनी विजयपाल सिंग हा फरार झाला आहे. या घटनेने लोणावळ्यात खळबळ माजली असून रेल्वे स्थानकावरील फेरीवाल्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले पुढील तपास करत आहेत.