आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Men Gang Rape 19 year old After Breaking Into House, Mp Sule Visits Her Home

पुण्यात विवाहितेवर बलात्कार: पीडित कुटुंबियांची खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याजवळील वडकी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या दोघांनी एका तरुण विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना शनिवारी घडली होती. ही घटना पुढे येताच या मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी पीडित कुटुंबियांची घेट घेत सांत्वन केले. तसेच या घटनेतील दोषींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या गुन्ह्याचा तपास त्वरित करून हा खटला फास्ट कोर्टात चालवावा अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचेही सुळेंनी सांगितले.
याबाबत सुळे म्हणाल्या, माझ्या मतदारसंघातील वडकी इथे एका महिलेवर अत्याचार झाल्याची बातमी समोर आली. शनिवारी घडलेल्या या घटनेबाबत गुन्हा नोंदवून घेण्यात यावा यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. आज सकाळी या पीडित कुटुंबीयाची भेट घेतली. अशा प्रकारच्या घटनांमध्ये गुन्हा त्वरित नोंदविला गेल्यास तपास कार्यान्वित होऊन आरोपी लवकरात लवकर पकडण्यास मदत होत असते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोलणे झाले या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे या संदर्भात मी प्रयत्नशील राहणार आहे. हा खटला फास्ट कोर्टात चालवावा अशी मागणी मी सरकारकडे करणार आहे. मला या घटनेवरून राजकारण करायचे नाही. कारण सरकार कोणाचेही असले तरी अशा घटना घडत राहतात. महिला सुरक्षांचा विषय हा राजकीय नसून तो सामाजिक आहे. त्यासाठी कठोर पावले उचलली गेली पाहिजे हेच वारंवार उघड होणा-या घटनेवरून दिसून येत आहे.
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या दोन अज्ञात चोरांनी एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना वडकी (तालुका हवेली) येथे उघडकीस आली होती. शनिवारी सायंकाळी सातनंतर हा प्रकार घडला. सदर महिला घरात एकटी होती. आपल्या पतीशी मोबाइलवर बोलत बोलत ती घराच्या बाहेर आली. त्या वेळी शेजारी असलेले दिराचे घर तिला अर्धवट उघडे दिसले तसेच आतून खडबडीचे आवाजही ऐकू आले. त्यामुळे ही महिला दिराच्या घरात शिरली. तेव्हा दोन अनोळखी तरुण तिला आत दिसले. ‘तुम्ही कोण’, असे विचारण्याच्या प्रयत्नातील या महिलेचे तोंड त्या दोघांनी दाबले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर सदर माहिती पोलिसांपर्यंत पोहोचताच, पोलिस अधीक्षक (पुणे ग्रामीण) मनोज लोहिया, अप्पर पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.