Home | Maharashtra | Pune | Udayanraje Bhosale Comment On Current Political Situation Of Maharashtra

वेळ आली तर नक्षलवाद्यांचाही नेता होईन : उदयनराजे भोसले

विशेष प्रतिनिधी | Update - Feb 23, 2015, 01:48 AM IST

न्याय मिळत नाही तेव्हा नक्षलवाद जन्माला येतो. न्याय मिळत नसेल तर लोक तयार आहेत.

 • Udayanraje Bhosale Comment On Current Political Situation Of Maharashtra
  पुणे - ‘न्याय मिळत नाही तेव्हा नक्षलवाद जन्माला येतो. न्याय मिळत नसेल तर लोक तयार आहेत. काळ लांब नाही. टायमर चालू झालाय. जनक्रांती होण्याची चिन्हे आहेत. लोक काय करतील याचा नेम राहिलेला नाही. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांचा नेता होण्याची वेळ आली तर मी मागे हटणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी दिला.

  लोकप्रतिनिधींनी लोकहितासाठी जगले पाहिजे. ज्या लोकांमुळे पदे मिळतात त्यांनाच चिरडण्याचा प्रयत्न केला तर लोक घरात घुसून खलास करतील. गाड्या अडवून मारतील. आपण महासत्तेकडे चाललोय की विनाशाकडे ते समजत नाही. आपल्या देशात ‘सिरिया-लिबिया’ होता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

  एमपी म्हणजे मिलिटरी पोलिस : देशात कुणाचा धाक राहिलेला नाही. दाभोलकरांना गोळी घालण्यात आली. गोविंद पानसरेंना मारले. याचा नुसता निषेध करून काय उपयोग ? लोकांना कृती हवी आहे, असे खासदार भोसले म्हणाले.

  ‘चार-सहा वर्षांच्या मुलींवर बलात्कार होतात. या प्रकारांची मला लाज वाटते. असल्या लोकांना भर चौकात आणून गोळ्या घातल्या पाहिजेत. कुठले कोर्ट आणि कुठले पोलिस? ‘एमपी’चा अर्थ मी खासदार असा घेत नाही. एमपी म्हणजे मी मिलिटरी पोलिस आहे,’ असे भोसले म्हणाले.
  सरकार भांडवलदारांचे : काम न करणाऱ्या आजी- माजी आमदारांना, मंत्र्यांना लोकांनी जाब विचारला पाहिजे. त्यांना फिरू देता कामा नये. या आधी आघाडी सरकार होते. आता बहुमतातले सरकार आहे. दम असेल तर या सरकारने काम करुन दाखवावे. नुसत्या घोषणांना लोक कंटाळले आहेत, असे भोसले म्हणाले. भांडवलदारांनी भांडवलदारांसाठी चालवलेले भांडवलदारांचे सरकार म्हणजे सध्याचे सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली.
  हुकूमशहाला जुमानत नाही

  ‘भारतातल्या लोकांना हुकूमशाही आवडत नाही हे दिल्लीतल्या निकालाने सिद्ध केलेय. दिल्लीकरांचा कौल ‘आप’ला नव्हता तर तो हुकूमशाहीच्या विरोधातला होता. वेळेत शहाणे झाला नाहीत तर जे दिल्लीत घडले तेच देशातल्या प्रत्येक राज्यात घडेल. बाकी कोणासाठी नाही पण किमान चहावाल्याची तर काळजी करा,’ असा चिमटा उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काढला. भूसंपादन कायद्याला माझा कडाडून विरोध असेल. हिंमत असेल तर सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

  ‘बारामती पॅटर्न’ची खिल्ली

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती भेटीत शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून इतर सर्व प्रश्नांवर चर्चा झाली. विकासाचा कसला आलाय ‘बारामती पॅटर्न’, अशी खिल्लीही भोसले यांनी उडवली. भूसंपादन कायद्याच्या विरोधातली माझी भूमिका पक्की आहे. या बाबतीत मी पक्ष, नेता यांना मानत नाही, असेही सांगायला ते विसरले नाहीत.

Trending