आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Raj Thackeray Meeting Saamana Gives Front Line News

‘अच्छे दिन’ला लगाम; उद्धवसोबत भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, राज ठाकरेंचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘रुग्णालयामध्ये मी आणि उद्धव भेटलो किंवा काल शिवाजी पार्क येथे आमची भेट झाली. यातून राजकीय अर्थ काढणे बरोबर नाही,’ असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी पुण्यात व्यक्त केले. ‘मी फक्त बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठीच गेलो होतो. राजकीय चर्चा करायची असेल तर ती अशा ठिकाणी करू का?’, असा प्रश्न उपस्थित करून राज यांनी शिवसेनेबरोबर मैत्री जुळवण्याच्या कथित चर्चांना सुरुंग लावला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कवर उद्धव आणि राज यांची भेट झाली. शिवसेनेचे मुखपत्र सामना दैनिकाने या भेटीचे वार्तांकन करताना ‘अच्छे दिन आयेंगे’ अशी भविष्यवाणी वर्तवली होती. मात्र, स्मृतिदिनाला जाण्याचा विषय राजकारणाशी संबंधित नाही. याच्या फार खोलात जाऊ नका, असे स्पष्ट करून राज यांनी यातली हवा काढली.
भेटण्यात गैर काय?
मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले, ‘गेल्यावर्षी बाळासाहेबांचा पहिला स्मृतिदिन होता. त्या वेळी शिवाजी पार्कवर मी जाऊ शकलो नाही. त्यामागे काही कारणे होती. त्याच्या खोलात मी आता जाऊ इच्छित नाही. बाळासाहेबांचा दुसरा स्मृतिदिन होता. तिथे जाण्यात गैर काय?’ तिथे उद्धव जर बसला असेल तर अशा वेळी आपण भेटतोच ना? यातून कोणतेही अर्थ काढण्याची गरज नाही. माझ्या मुलीचा अपघात झाल्यानंतर उद्धव हॉस्पिटलमध्ये भेटायला आला. मी काल स्मृतिदिनासाठी शिवाजी पार्कवर गेलो. या दोन्ही प्रसंगांमध्ये राजकारणाचा विषय येतो कुठे?’ असे राज यांनी स्पष्ट केले.
उर्वशीचे ‘एफबी’ अकाउंट बनावट
उर्वशीच्या फेसबुक किंवा टि्‍वटर अकाउंटवरून काही वादग्रस्त पोस्ट टाकल्याचे चर्चेत आहे. मात्र, माझ्या मुलीचे कोणत्याही सोशल मीडियावर कोणतेही अधिकृत अकाउंट नसल्याचे स्पष्टीकरण राज यांनी दिले.
निर्णय शिवसेनेने घ्यायचाय
‘राज्यात सध्या सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच समजत नाही. इतकी विचित्र राजकीय स्थिती यापूर्वी कधी आली नव्हती,’ असा टोला राज यांनी शिवसेनेला लगावला. ‘भाजप त्यांचे राजकारण करणारच. निर्णय घ्यायचाय तो शिवसेनेने. त्यांच्या जागी मी असतो तर काय केले असते, हे मी आधीच सांगितले आहे. त्या दोन पक्षांनी काय करावे, हे मी सांगणार नाही’, असे राज म्हणाले. शरद पवारांनी वर्तवलेल्या मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेबाबत भाष्य करणे ठाकरे यांनी टाळले.
हे वागणं बरं नव्हं
‘आवाजी मतदान ही बहुमत सिद्ध करण्याची पद्धत होऊ शकत नाही. बहुमत सिद्ध करताना सगळ्या पक्षांची भूमिका समोर यायला हवी होती. त्या दिवशी प्रत्यक्षात काय झाले हे कोणालाच काही कळलेले नाही. सर्वांनी ठरवून काही केलेय का, अशीही शंका यातून निर्माण होते,’ असा आरोप राज ठाकरे यांनी व्यक्त केला. सगळा कचरा घ्यायचा आणि कार्पेटखाली घालायचा याला अर्थ नाही. मतदान घेऊन सगळे लोकांपुढे येऊ द्या, असे आवाहन त्यांनी केले.