आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Tackeray & Sharad Pawar Together In Pune, Uddhav Slam To Cm Fadnavis

शरद पवारांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र; पवारांचे मात्र नराे वा कुंजराे वा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘उत्तराखंड प्रकरण केवळ न्यायालयाच्या किंवा राष्ट्रपतींच्या अवमानापुरते मर्यादित नाही. सत्ताप्राप्तीसाठी घाई करणाऱ्यांमुळे देशाचे जगात हसे झाले आहे. राष्ट्रपतींचा दुरुपयोग करणाऱ्यांनी याची जाण ठेवावी. यामुळे जगात देशाची प्रतिमा खराब होते. सत्तेसाठी एवढी घाई काय कामाची? चांगले काम केल्यानंतर लोक स्वत:हून सत्ता देतात,’ अशी कडवट टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भाजपवर केली. तेही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत. निमित्त होते पुणे महानगरपालिकेने उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या उद‌्घाटनाचे.
खरे तर ज्या शिवसेना- भाजपमुळे पवारांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले, त्यांना खिंडीत गाठण्याची संधी शोधून टीकास्त्र सोडायचे काम पवारांचे. त्यांच्याकडून खंद्या विरोधकाची भूमिका अपेक्षित. पण एखाद्या खंद्या विरोधकाने निभवावी तशीच भूमिका पवार नव्हे तर उद्धव निभावत आहेत. राज्य आणि केंद्राच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले असतानाही उद्धव भाजपवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. जाहीर कार्यक्रम असो की पक्षाचे मुखपत्र, उद्धव सातत्याने भाजपवर टीकेचा भडिमार करत आले आहेत. उत्तराखंडच्या काँग्रेस आमदारांनी बंड केल्यानंतर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्या निर्णयाला उत्तराखंड उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचे निमित्त साधून भाजप किती सत्तापिपासू बनला आहे, हे सांगण्याचा प्रयत्न उद्धव यांनी या निमित्ताने केला. ‘शिवाजी महाराज की जय म्हणायचे आणि दिल्लीश्वरांपुढे झुकायचे हे आम्हाला जमणार नाही. शिवसेनाप्रमुखांनी जी आग आमच्यात पेरली, वारसाहक्काने ज्या ठिणग्या आमच्यात आल्या त्या उडणार म्हणजे उडणारच,’ असा इशाराही द्यायला उद्धव विसरले नाहीत. विशेष म्हणजे उद्धव यांनी उत्तराखंडचा विषय छेडून पवारांच्या हाती आयते कोलीत दिले होते. पण पवारांनी त्या विषयाचा एका शब्दानेही उल्लेख केला नाही. ना केंद्र सरकारवर टीका ना राज्य सरकारची झाडाझडती! पवारांनी केले ते फक्त बाळासाहेब ठाकरेंचे गुणगान. बाळासाहेब किती मोठे राजकीय नेते आणि व्यंगचित्रकारही होते, हे पवारांनी सांगितले. पवारांना प्रसंगानुरूप कोणत्या ठिकाणी काय बोलायचे याचे भान आपण कसे ठेवतो, हे दाखवून द्यायचे असेलही कदाचित. मात्र उद्धवातोंडीची भाषा ‘चित्त अस्वस्थ परि ते मित्र शत्रू होती....’ याचीच प्रचिती देणारी ठरली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सुप्रियांची खासदारकी, अाश्वासन केले पूर्ण... ‘इंदिराजींकडेच सत्ता यावी असे बाळासाहेब म्हणायचे’