आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEWS @ MH: महाराष्ट्र सदनाचे हॉटेल व लॉज बनवा- उद्धव ठाकरेंची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- उद्धव ठाकरे)
नाशिक- राष्ट्रवादीचे माजी नेते व मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र गावित यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला. नंदूरबारमधील काँग्रेसचे मंत्री पद्माकर वळवी यांच्याविरोधात गावित यांना उमेदवारी दिली जाणार आहे.
राजेंद्रकुमार गावित हे राज्य सरकारमध्ये शासकीय नोकरीत होते. मात्र, चार महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यामुळे ते राजकारणात प्रवेश करतील असे बोलले जात होते. नंदूरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी हे शहादा मतदारसंघाचे सध्या प्रतिनिधित्व करत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीत आगामी विधानसभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेत आहेत. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पूर्वतयारीची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजल्यापासून घेत आहेत. या दरम्यान त्यांनी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन, छगन भुजबळ यांच्यासह राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्र सदनातील गैरप्रकाराविरोधात आंदोलन केले आहे. ते कोणाच्या विरोधात किंवा धर्माविरोधात नाही. मात्र लक्ष हटविण्यासाठी कांगावा केला जात आहे. आधी महाराष्ट्र सदनात घोटाळा झाला आता कॉन्ट्राक्टवरून भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्र सदनातील या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. मध्यंतरी मराठी कलाकारांना हे सदन उपलब्ध करून दिले नाही. मग याला महाराष्ट्र सदन कशाला म्हणायचे. याचे सरळ लॉज करून हॉटेल करा ना मग कोणीही आयाराम-गयाराम आला तरी आमचे काही म्हणणे नसेल. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे मी पेपरात वाचले आहे. बघू या काय होते ते असे मत उद्धव ठाकरे यांनी सांगितले. धनगर समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे असे उद्धव यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या समाजाला स्पेलिंग मिस्टेकमुळे गेली 60 वर्षे आरक्षणापासून वंचित राहावे लागले. यापुढे या समाजाच्या मागणीसाठी शिवसेना त्यांच्यासोबत राहील असेही ठाकरेंनी सांगितले.