आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरोधी विचार संपवण्याचा कपटीपणा सप्तर्षींकडे नाही- उद्धव ठाकरे यांच्याकडून गाैरवाेद‌्गार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘वैचारिक मतभेद असले पाहिजेत, मात्र या विरोधाचे रूपांतर शत्रुत्वात होऊ न देण्याचे भान जपणारी नेतृत्वाची पिढी बाळासाहेब ठाकरे, डॉ. कुमार सप्तर्षी यांची होती. विरोधी विचारांना संपवण्याचा कपटीपणा त्या पिढीने कधी दाखवला नव्हता,’ असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सप्तर्षी यांचा पंच्याहत्तरीनिमित्त रविवारी पुण्यात सर्वपक्षीय गौरव झाला त्या वेळी ठाकरे बोलत होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, खासदार रजनी पाटील, हुसेन दलवाई, भाजपचे गिरीश बापट, बबन पाचपुते, शिवसेनेचे विजय शिवतारे, राष्ट्रवादी नेते अरुण गुजराथी, आमदार बच्चू कडू, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, अभिनेते गिरीश कुलकर्णी, डाॅ. सप्तर्षी यांच्या पत्नी ऊर्मिला आदी उपस्थित होते. अन्वर राजन यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी येथे कसा? याचे अनेकांना आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे. मात्र सप्तर्षी यांची विचारधारा वेगळी आहे. आम्ही जात-पात मानत नाही, पण धर्म मानतो. आमच्या पिढीपुढे जे आदर्श होते त्यापैकी एक सप्तर्षी असल्याने मी आवर्जून आलो. तुमचे विचार पटोत ना पटोत, पण त्या विचारांशी सप्तर्षी यांनी कधी प्रतारणा केली नाही. मर्यादांच्या खुर्चीत ते कधीच बसले नाहीत. अन्यथा ते केव्हाच राज्यपाल झाले असते,’ असे सांगतानाच ‘माझे काही चुकले तर माझा कान धरण्याचा अधिकार तुम्हाला आहे,’ असेही ठाकरे म्हणाले.
‘स्वतंत्र भारताच्या इतिहासातील महाराष्ट्रातील आगळे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सप्तर्षी. ‘वादळ’ हा शब्दप्रयोग त्यांच्या बाबतीत खरा आहे,’ असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सप्तर्षींनी आंदोलने केली, पण तोडफोड, आक्रस्ताळेपणा कधी केला नाही. एका पिढीची वैचारिक जडणघडण त्यांनी केली. आजचे सत्ताधारी हुशारीने धार्मिक ध्रुवीकरण करू पाहत आहेत. त्याविराेधी लढाईला सप्तर्षी यांनी बौद्धिक बळ द्यावे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. “न पटणारे विचार मांडले तर तुम्हाला संपवले जाण्याची भीती वाटावी असा आजचा काळ आहे. याविरोधात सत्याग्रह करण्याची गरज आहे,’ असे चपळगावकर म्हणाले.
भूतकाळ भयंकर : उर्मिला
‘चळवळ्या मुलाशी लग्न केल्याने नोकऱ्या जायच्या. पहिला ‘मिसा’ लागलेला हा माणूस. आंदोलने, तुरुंगवास.. तो काळ भयंकर गेला. संघर्षाचे आयुष्य कसे सरले याचे मागे वळून बघताना आश्चर्य वाटते,’ अशा भावना डाॅ. सप्तर्षी यांच्या पत्नी ऊर्मिला यांनी व्यक्त केल्या. ‘समाजवाद्यांनी धर्माशी नेहमीच फारकत घेतली. डॉ. सप्तर्षी यांनी धर्माचे शुद्धीकरण म्हणजेच धार्मिकता हे भान जपले. ऐंशीच्या दशकात त्यांनी पुरीच्या शंकराचार्यांशी घातलेला वाद ही राज्यााच्या इतिहासातील अविस्मरणीय घटना आहे,’ असे डॉ. मोरे म्हणाले.

‘चुकीचे काही सांगायचे नाही आणि आपल्या आंदोलनात एकही माणूस मरता कामा नये हा माझा पण होता. सत्याग्रही विचारधारा माणूस जागा करते. माणूस जागा करण्याचे काम खतरनाक आहे. कारण अशांना संपवता येत नाही. सत्काराच्या निमित्ताने मला चिकटवलेले गुण अंगीकारण्याची साधना मी उर्वरित आयुष्यात करेन,’ असे डाॅ. सप्तर्षी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
बाळासाहेबांमुळे मुंबईत ‘जेपीं’ची सभा
शिवसेनेची स्थापना केल्यावर वर्षभराने बाळासाहेब ठाकरे पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी मला शिवसेनेत येण्याचा आग्रह केला. ते मला ज्येष्ठ होते.‘तू लढाऊ आहेस, शिवसेनेत का येत नाही?’ असा प्रश्न त्यांनी केला. वेगळ्या वैचारिक भूमिकांमुळे तसे घडले नाही, परंतु आमच्यातील स्नेह कायम राहिला. पुढे जयप्रकाश नारायण (जेपी) यांना मुंबईत सभा घ्यायची होती. मुंबईतली पहिलीच सभा शिवसेनेमुळे अयशस्वी झाली तर देशात वाईट संदेश जाईल, अशी भीती जेपींना होती. बाळासाहेबांचा पाठिंबा मिळवण्याची भूमिका जेपींनी माझ्यावर टाकली होती. त्या वेळी बाळासाहेबांनी जेपींना पाठिंबा दिलाच. एवढेच नव्हे नंतर बाळासाहेब स्वत: जेपींना भेटायलाही गेले हाेते.
- डाॅ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ विचारवंत
धाकट्याकडे दुर्लक्ष कर
उद्धव ठाकरे यांनी डॉ. सप्तर्षी यांचा खास सत्कार करताना त्यांच्या खांद्यावर भगवी शाल टाकली आणि गणपतीची मूर्ती भेट दिली. या वेळी सप्तर्षी यांनी ‘धाकट्याच्या खोड्यांकडे लक्ष देऊ नकोस,’ असा वडीलकीचा सल्ला उद्धव यांना दिला.
बातम्या आणखी आहेत...