आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाव तिथे सेना, घर तिथे सैनिक; उद्धव ठाकरेंचा ‘कामाला लागा’ हाच संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त विधानसभेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहू नका; तर महाराष्ट्राच्या गावागावात पक्ष पोचला पाहिजे. प्रत्येक घरात सैनिक असला पाहिजे, हे ध्येय ठेवून कामाला लागा,’ असे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले. येत्या विधानसभेत दीडशे जागा जिंकण्याचा मनोदयही त्यांनी कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केला.
शिवसेनेच्या ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या मोहिमेचा प्रारंभ ठाकरे यांनी पुण्यातून केला. या वेळी ते बोलत होते. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार डॉ. नीलम गोर्‍हे आदी उपस्थित होते. येत्या महिनाभराच्या काळात राज्यातल्या प्रत्येक घरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी करावा यासाठी ठाकरे यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. याची सुरुवात त्यांनी पुण्यातून केली. ठाकरे यांचा पुढचा दौरा गोंदिया येथे असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या ऐतिहासिक यशामध्ये ‘मोदी लाटेचा’ सिंहाचा वाटा असल्याचे सगळीकडे बोलले जात आहे. केंद्रात सत्तास्थापनेसाठी भाजपला कोणाचीच गरज न भासल्याने शिवसेनेला दुय्यम स्थानी समाधान मानावे लागत आहे. राज्यातही भाजप वरचढ चढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला चाप बसवण्यासाठीही शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी चालवला आहे. पुण्यातल्या कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे यांनी चाळीस मिनिटे भाषण केले. ‘कामाला लागा’ हाच संदेश त्यांनी या भाषणातून दिला.

पवारांना लवासाचेच स्वप्न
‘सामान्य जनतेला स्वस्तात घरे देण्याचे, गोरगरिबांना स्वच्छ पाणी मिळवून देण्याचे स्वप्न पवारांना पडत नाही. त्यांनी आणखी 26 लवासा उभारण्याचीच स्वप्ने पडतात. धरणांजवळ बांधकामे करता येणार नसल्याची झुल उठवायची. जमिनीच्या किमती पाडायच्या. बगलबच्च्यांना स्वस्तातल्या जमिनी विकत घ्यायला लावायच्या आणि नंतर तिथे लवासासारखे प्रकल्प आणायचे. हाच पवारांचा पूर्वीपासूनचा धंदा आहे,’ अशी टीका ठाकरे यांनी केली.

वारीला धक्का लागू देऊ नका
‘आषाढी वारीसाठी लाखो वारकरी भक्तीभावाने चालत जातात. पण विठ्ठलाच्या पुजेचा पहिला मान हेलिकॉप्टरने जाणार्‍या मुख्यमंत्र्यांना मिळतो. पंढरपुरात 4 हजार शौचालये बांधली नाहीत तर वारीच्या प्रथेवर निर्बंध आणण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे. वारकर्‍यांचे हे प्रश्न मुख्यमंत्री कधी सोडवत नाहीत. वारीच्या प्रथेला धक्का लागू देऊ नका,’ असा इशारा ठाकरे यांनी दिला.

डोहाळे लागले नाहीत पण...
‘मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागलेले नाहीत; परंतु भ्रष्ट आघाडी सरकार सत्तेतून गेलेच पाहिजे,’ असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदाची आस नसल्याचे ते एका बाजूला सांगत असतानाच शिवसेनेचे सर्व नेते मात्र एकमुखाने ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्याचीच भाषा बोलत होते. लोकसभेतील यशामुळे महायुतीत वरचढ ठरू पाहणार्‍या भाजपला कह्यात ठेवण्यासाठी शिवसेनेने आखलेली ही रणनीती असल्याचे सांगण्यात आले.