आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यक्तिगत महत्त्वकांक्षेला व सत्तेसाठी शिवसेनेत येणा-यांना थारा नाही- उद्धव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आगामी काळात राज्यात भगव्याचे सरकार आणायचे आहे. यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम सुरु करावे. आता आपलेच राज्य येणार आहे म्हणून अनेक जण आपल्याकडे येण्याच्या तयारीत आहेत. मात्र, केवळ आमदार होण्यासाठी व व्यक्तिगत महत्त्वकांक्षा घेऊन पक्षात येणा-यांना शिवसेनेत स्थान देणार नाही असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे येथे केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभेवर भागवा फडकविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मंगळवारपासून शिवसेनेची 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' ही राजव्यापी मोहीम सुरु झाली. या झंझावाती मोहिमेचा प्रारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुणे येथील आजच्या मेळाव्याने झाला. पुण्यातील गणेश कला-क्रीडा संकुलात आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार हटाव मोहिमेचे रणशिंगच फुंकले गेले.
उद्धव ठाकरे यांनी मुंबई, नाशिक व पुणे या त्रिकोणातील विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. मुंबई व ठाण्यात एकून 60 मतदारसंघ आहेत. या भागात शिवसेनेचा मोठा प्रभाव आहे. तसेच लोकसभेत पक्षाला तेथे जबरदस्त यश मिळाले आहे. पुणे व नाशिक पट्ट्यातही शिवसेनेला लोकसभेला यश मिळाले आहे. त्यामुळे तसेच यश विधानसभेला मिळावे यासाठी या त्रिकोणावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. यासाठी शिरूर व मावळचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांना विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ते तयारीला लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरोधात लोकांत तीव्र असंतोष आहे त्याचा फायदा घेण्याचे शिवसेनेचे नियोजन आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि त्यांच्या आणखी 26 लवासासारखे प्रकल्प वसविले जाऊ शकतात या वक्तव्यावर टीका केली.
महाराष्ट्राला पुन्हा नंबर वन बनविण्यासाठी आणि स्वच्छ पारदर्शक शिवशाहीचे सरकार आणण्यासाठी 24 जुन ते 23 जुलैपर्यंत शिवसैनिक 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' ही राजव्यापी मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेद्वारे शिवसैनिक व पर्यायाने पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावाखेड्यात घरोघरी पोहोचणार आहे. गाव तेथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे लक्ष्य समोर ठेवून ही मोहीम शिवसेनेने आखली आहे.
मतदार नोंदणीविषयक जागरुकता आणि घोटाळेबाज आघाडी सरकारच्या काळ्या कारकिर्दीचे वस्त्रहरण आदी कार्यक्रमांचा धडाका 23 जुलैपर्यंत राज्यभर सुरु राहणार आहे. आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचा पंचनामा करणारी 'काळी पुस्तिका' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असून ती शहरापासून गावा-खेडयात वितरीत केली जाणार आहे.
महिन्याभरासाठी अशी असेल राज्यव्यापी मोहिम व कार्यक्रम
शिवसेना सदस्य नोंदणी, सभा, मेळावे, उद्घाटने, मिरवणुका, संपर्क अभियान, गाव तिथे शाखा, नवीन शाखांची उद्घाटने, शाखांचे पक्के फलक, शिवसेना शाखा डायरी, शिवबंधन सोहळे, घर तिथे शिवसैनिक, मतदार हक्क अभियान, वगळलेले मतदार नोंदवणे, नवतरुण मतदारांची नोंदणी, कुटुंबांना मतदार कार्ड वाटप, मतदार सेवा कक्षांची स्थापना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळ्या कारभाराचे वस्त्रहरण, मंत्र्यांच्या घोटाळ्यांचा पंचनामा, रखडलेल्या विकासाचा जाब, राज्याच्या पीछेहाटीची काळी पुस्तिका.