आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक, पतसंस्था फोडणारा उमकने सोलापुरातही 10 लाख लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यातील व परराज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँका व पतसंस्था फोडणारा इंजिनिअर गुन्हेगार सुरेश उमक याने आणखी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती शिरूर पोलिसांनी दिली. सोलापूर येथील ब्रह्मदेव बॅँक फोडून उमक याने 2012 मध्ये दहा लाख रुपये लंपास केल्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी सांगितले. त्याला न्यायालयाने 1 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.


महाराष्‍ट्रासह शेजारी राज्यांमध्ये बॅँकफोडी करणा-या सुरेश उमकने तीन वर्षांपूर्वी प्लास्टिक सर्जरी करून औरंगाबादेत वास्तव्य केले होते. मागील आठवड्यात त्याला नागपूरमधून अटक करण्यात आली. मूळ अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमकचे अनेक गुन्हे आता समोर येऊ लागले आहेत. 2002 मध्ये त्याने अमरावती जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवल्याचेही समोर आले होते.


गेवराईत प्रयत्न फसला
उमकने बीड जिल्ह्यातील गेवराई येथील जिल्हा बॅँक व पुणे जिल्ह्यातील ओझर येथील एक बॅँक फोडण्याचाही प्रयत्न केला होता. त्याच्या औरंगाबाद व अमरावती जिल्ह्यातील कमळापूर येथील घराची झडती घेण्यात आली, मात्र पोलिसांना कोणतीही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सापडली नाहीत. गुजरात, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये उमकने केलेल्या गुन्ह्यांचा पोलिस आढावा घेत आहेत. त्याला परराज्यात तपासाकरिता नेण्यात येणार आहे.
एक ऑगस्ट रोजी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असून त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.