आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Under Twelve Years Offender Decide Only Minor Age Says Krishna Tirth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारा वर्षांच्या आतील आरोपीच अल्पवयीन ठरवावेत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सामूहिक गुन्हेगारी व अत्याचारांच्या प्रकरणात संबंधित आरोपींना अल्पवयीन ठरवणारी वयाची मर्यादा 12 पर्यंत खाली आणण्याची शिफारस नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सकडे (एनसीपीसीआर) करण्यात आली आहे. केंद्रीय महिला-बालकल्याण राज्यमंत्री कृष्णा तिरथ यांनी ही माहिती ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.


स्त्रियांवरील वाढते अत्याचार, स्त्री भ्रूणहत्या यासंदर्भात शासनाने विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमांतून सातत्याने अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे, असेही तिरथ यांनी म्हटले आहे. दिल्ली येथील राष्ट्रीय महिला सक्षमीकरण अभियान तसेच राज्य शासनाच्या महिला-बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त तिरथ पुण्यात होत्या. राज्याच्या महिला व बालविकासमंत्री वर्षा गायकवाड, अभियानाच्या राष्ट्रीय अतिरिक्त सचिव रत्नप्रभा, प्रधान सचिव उज्ज्वला उके, कार्यकारी संचालिका रश्मी सिंग यांचीही या वेळी उपस्थिती होती.


तपास चुकीचा म्हणणे अयोग्य
दिल्लीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात काही त्रुटी असतील; पण तपासच चुकीचा होता असे म्हणणे योग्य नाही. महिला अत्याचाराच्या प्रकरणांत पोलिस यंत्रणा संवेदनशील नसते, असा आरोप नेहमीच केला जातो. त्यात काही अंशी तथ्य असले तरी सरसकट हा आरोप करणे योग्य नाही. एखाद्या उदाहरणावरून पोलिस तपासाचे यशापयश ठरवणेही अयोग्य आहे, असे मत तिरथ यांनी मांडले.


स्त्री भ्रूणहत्या ही प्रमुख सामाजिक समस्या आहे. तिच्या निराकरणासाठी सक्षम महिला गट तयार करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत 11 ते 18 या वयोगटातील मुलांना महिलांना सन्मानाची तसेच समानतेची वागणूक देण्याचे शिक्षण दिले जाईल. महिलांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राजस्थानात योजना राबवण्यात येत आहे, असेही त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती
महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांसाठी वेगळे कायदे असावेत. तसेच त्यांची कठोर आणि त्वरित अंमलबजावणी व्हावी म्हणूनच अशा प्रकरणांतील गुन्हेगारांना अल्पवयीन ठरवणारे वय कमी करण्याची शिफारस केल्याचे तिरथ म्हणाल्या. सबला (राजीव गांधी एम्पॉवरमेंट ऑफ अ‍ॅडोलेसंट गर्ल्स) आणि सक्षम (मुलांसाठीची योजना) अशा दोन योजना सध्या राबवण्यात येत आहेत. मुख्यत: माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जाणीव-जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

मानसिकता बदलली पाहिजे
मुलींचा घटता जन्मदर, स्त्री भ्रूणहत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून या या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जनतेची मानसिकता बदलणे, हेच खरे उत्तर आहे.’
कृष्णा तिरथ, केंद्रीय महिला-बालकल्याण राज्यमंत्री