आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uninvited Rain Come In State, Low Pressure Belt Created In Coastal Area

राज्यात आगंतुक पावसाची हजेरी,किनारी भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने शिडकावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लक्षद्वीप समुद्रापासून गुजरातपर्यंतच्या किनारी भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने मंगळवारी पहाटेपासूनच राज्यातील थंडीने पळ काढला असून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. प्रामुख्याने मुंबई, गोवा आणि कोकणात पावसाचा शिडकावा झाला असून हीच परिस्थिती आगामी 24 तास टिकून राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात रविवारी सायंकाळी तसेच सोमवारी कोकण-गोवा-मुंबई या भागात अवकाळी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी, रायगड, पेण, अलिबाग, पोलादपूर, मुंबई, रोहा आदी ठिकाणी हलका पाऊस पडला. देशात राजस्थान, गुजरात, हरियाणा, बिहार, तमिळनाडू आणि केरळ येथेही पावसाची नोंद झाली. ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी मात्र सोमवारपासून गायब झाली आहे. किमान तापमानही 12 अंशांच्या घरात आहे.
मुंबई, ठाण्यातही हजेरी
मुंबई, ठाण्यातही मंगळवारी सकाळी अचानक वरुणराजाने हजेरी लावली, त्यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. आगामी 24 तासात वातावरण कायम राहणार असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. या पावसामुळे पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अंधेरी, सांताक्रुझ व वांद्रे परिसरातील रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोकल रेल्वेही सुमारे 10 मिनिटे उशिराने धावत होत्या.
नाशिक जिल्ह्यात द्राक्षांना फटका
नाशिक शहर व जिल्ह्यातील बहुतांश भागांत मंगळवारी सकाळी बेमोसमी पाऊस बरसला. दिवसभर कमी अधिक प्रमाणात रिमझिम सुरू होती. त्यामुळे नागरिकांना स्वेटर घालावे की रेनकोट, असा प्रश्न पडला. शहराच्या किमान तापमानात 7 अंशाने वाढ होऊन ते 17.4 अंश सेल्सियसवर गेले होते. या आठवड्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे इगतपुरी तांदुळ संशोधन केंद्राचे प्रभारी व्ही. एस.पाटील यांनी सांगितले. या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना मात्र मोठा फटका बसला. निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील द्राक्षांना तडे गेले, भुरीचाही प्रार्दुभाव वाढल्याने उत्पादकामध्ये चिंतेचे वातावरण आहे. भाजीपाला आणि गहु पिकालाही पावसाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
48 तास पावसाचा अंदाज
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत येत्या 48 तासांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील किमान तापमान
औरंगाबाद 18.8, नाशिक 17.4, सोलापूर 18.6, नगर 18.2, जळगाव 17.2, अमरावती 14, अकोला 18.6, परभणी 16, नांदेड 16.5, बीड 18.6, उस्मानाबाद 15.4, बुलडाणा 18.8, नागपूर 16.1, यवतमाळ 16, वर्धा 12, पुणे 18, सातारा 19, महाबळेश्वर 15.2, सांगली 18.6.