आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांची मिश्कील फटकेबाजी; विखे पाटलांना सर्व विषयांवर मार्गदर्शन करण्याची सवय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सत्तेत नसल्याने काहीशा निवांत झालेल्या शरद पवारांची मिश्कील फटकेबाजी ब-याच दिवसांनी ऐकण्यास मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून बाळासाहेब विखे-पाटील व नीलेश राणेपासून प्रणिती शिंदेंपर्यंत सर्वांनाच पवारांनी चिमटे काढले. ‘महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक नको. राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. या एकाच भूमिकेतून आम्ही भाजप सरकारला पाठिंबा देऊ केला. याचा अर्थ आरएसएसच्या विचारसरणीला आमचा पाठिंबा आहे असा होत नाही,’ असे पवार शनिवारी म्हणाले.

भाजप सरकारला पाठिंबा देऊन ‘राष्ट्रवादी’ने घाई केली का, या प्रश्नावर पवार म्हणाले, "अजिबात तसे वाटत नाही. पाठिंब्याचा निर्णय आम्ही योग्य वेळीच घेतला. उलट आमच्या निर्णयाचे परिणाम आपण पाहतोच आहोत.' मुख्यमंत्री फडणवीस ‘उत्साही’ आहेत. ‘अभ्यासू’ आहेत असे ऐकले आहे. मात्र त्यांच्याबरोबर मी कधी काम केले नसल्याने काही सांगता येणार नाही. त्यांच्या वडिलांबरोबर माझी मैत्री होती. विधिमंडळात आम्ही एकत्र कामही केले होते. महाराष्ट्राला बहुजन मुख्यमंत्री हवा होता, हे एकनाथ खडसे यांचे विधान लक्ष देण्यासारखे नाही. ते म्हणाले, ‘त्यांच्या पक्षात खदखद असावी असे या वक्तव्यावरून दिसते. पण मी मुख्यमंत्र्यांकडे ते या समाजाचे किंवा त्या समाजाचे या अंगाने पाहत नाही. मुख्यमंत्र्यांची धोरणे राज्याच्या विकासासाठी किती उपयोगाची ठरतात, हे मी पाहीन.’

दोन ‘पाटलां’ना चिमटे
काँग्रेसने भाजपला पाठिंबा द्यावा, या काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटलांच्या विधानावर पवार म्हणाले, त्यांना सर्वच सर्व विषयांवर मार्गदर्शन करण्याची सवय आहे. त्यानुसार ते बोलले.’ सहकारमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असल्याने त्यांना ऊस प्रश्नाची जाण असेल. सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे. तोपर्यंत भाजप-सेना एकत्र आले तर ‘सुंठीवाचून खोकला गेला.’ तसे झाले नाहीच तर मग बघू काय करायचे ते, अशी गुगली पवारांनी टाकली.

‘मनसे’ला पवारांचा दिलासा
मनसेचा एकच आमदार निवडून आला. यावर पवार म्हणाले, ‘निवडणुकीचे निकाल कोणाला कधी संपवत नसतात. ८४ मध्ये मी पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये गेलो तेव्हा भाजपचे दोनच सदस्य होते. तोच पक्ष आज स्वबळावर देशात सत्ताधारी झालाय.'