पुणे - राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या एकामागोमाग एक कृती वादग्रस्त ठरत असून त्यातून तावडेंच्या अखत्यारीतील सांस्कृतिक आणि शैक्षणिक खात्यातील अनेक ‘विनोद’ समोर येत आहेत. नुकतेच तावडे यांनी दिवंगत साहित्यिक प्रा. रा. ग. जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र पाठवल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील साधना ट्रस्टच्या पत्त्यावर तावडे यांच्या सही, शिक्क्याचे हे पत्र दाखल झाल्यावर साहित्यिक वर्तुळात या गलथानपणाचे पडसाद उमटले. प्रा. जाधव सर हे औरंगाबाद येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. राज्य सरकारच्या मराठी विश्वकोश मंडळाचे संपादकपद जाधव यांनी भूषवले होते. राज्य सरकारचा विंदा करंदीकर स्मृती गौरव पुरस्कारही जाधव यांना प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या वर्षी २०१६ साली दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. तावडे यांनी त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली होती. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्री असलेल्या तावडे यांनी मृत लेखकाला वाढदिवशाच्या शुभेच्छा देणारे पत्र स्वत:च्या सहीने पाठवावे, हे असंवेदनशील आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
ही देखील ‘परंपराच’?
राज्याच्या सांस्कृतिक मंत्रिमहोदयांनी दिवंगत व्यक्तीच्या बाबत उपरोक्त वागण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. याआधी अनिल देशमुख हे खाते सांभाळत असताना, दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्या बाबतीत हाच प्रकार झाला होता. गोखले यांचे निधन झाल्यावर काही महिन्यांनी चित्रपट गौरव समारंभ प्रसंगी याच अनिल देशमुख यांनी ‘कृपया मोहन गोखले यांनी व्यासपीठावर यावे,’ अशी सूचना ध्वनिक्षेपकावरून केली होती.
तावडेंची सारवासारव
या गोंधळासंदर्भात विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधल्यावर नामसाधर्म्यामुळे हा गोंधळ झाल्याचे ते म्हणाले. पत्त्यांची अदलाबदल झाल्याने शुभेच्छांचे हे पत्र परभणी येथील संघ स्वयंसेवक रमेश जाधव यांच्याऐवजी पुण्यात रा. ग. जाधव यांच्या नावाने साधनाच्या पत्त्यावर पाठवले गेल्याची सारवासारवी तावडे यांनी केली.