आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन्ही पालख्यांचा निघाला व्हर्च्युअल सोहळा; फेसबुक पेजच्या दिंडीत अनेकांचा सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सोशल मीडियाच्या नकारात्मक वापरामुळे होणारे विघातक परिणाम समोर येत असतानाच याच माध्यमाचे एक अनोखे सकारात्मक रूपही आषाढी वारीच्या निमित्ताने समोर आले आहे. वारीची परंपरा घरात असणार्‍या तरुणाईने व्हर्च्युअल दिंडीच्या रूपाने एक नवा स्वागतार्ह पायंडा पाडला आहे. या व्हर्च्युअल दिंडीला मिळणारा लक्षावधींचा प्रतिसाद पाहून यापुढे वारीचा ई-सोहळाही गाजणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

तुकोबांच्या वारीचे सोहळाप्रमुख असलेल्या घरातले स्वप्निल मोरे आणि प्रज्ञेश मोळक हे दोन सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेले तरुण एकत्र आले आणि या व्हर्च्युअल दिंडीने जन्म घेतला. प्रत्यक्ष वारीत सहभाग घेणारे लक्षावधी वारकरी असले तरी इच्छा असूनही वारीत प्रत्यक्ष सहभाग घेऊ न शकणारेही लक्षावधी आहेत. याची जाणीव ठेवून अशांसाठी समग्र वारीच त्यांच्यापर्यंत नेता यावी म्हणून व्हर्च्युअल दिंडीची संकल्पना व नियोजन केले, असे स्वप्निल म्हणाला. ‘मी देहूमध्ये जन्मलो. घरात वारी होतीच. त्यामुळे ते संस्कार होतेच. पुढे सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करायला लागल्यावर ही कल्पना सुचली. सुरुवातीला फक्त फेसबुकवरच्या मित्र-मैत्रिणींना वारीतले अपडेट्स कळावेत म्हणून एक पेज सुरू केले. पण हळूहळू त्याचा प्रतिसाद इतका वाढला की थेट व्हर्च्युअल दिंडीच काढण्याचे ठरवले,’ असे त्याने सांगितले.

40 लाखांहून अधिक नेटकरी
अगदी सुरुवातीला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन्ही पालख्या एकत्रित जात असत. कालांतराने 1832 पासून तुकोबा आणि माउलींच्या पालख्या स्वतंत्रपणे मार्गक्रमण करतात. मात्र, या व्हर्च्युअल दिंडीत आम्ही पुन्हा एकदा या संतश्रेष्ठांच्या पालख्या एकत्र केल्या, असे प्रज्ञेशने सांगितले. प्रज्ञेश हा माउलींच्या पालखीचे मुख्य चोपदार असणार्‍या राजाभाऊ चोपदार यांचा भाचा आहे. यंदा आमच्या व्हर्च्युअल दिंडीत 40 लाखांहून अधिक नेटकरी सहभागी होत आहेत. विदेशातली मराठी मंडळीही आता दिंडीत असल्याचा फील घेऊ शकतात.