आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्व साहित्य संमेलन अंदमानात होणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गाजावाजा करून घोषित केलेले दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गचे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन बारगळले आहे. अखेर ‘विश्वा’चा नाद सोडून भारतीय भूमीतच विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनाची तयारी साहित्य महामंडळाने चालवल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात कुठेही संमेलनाला थारा मिळत नसल्याने साहित्य महामंडळ अगतिक झाल्याचेही उघड झाले आहे.

‘शिवसंघ संस्थे’ने यापूर्वी दोन वेळा साहित्य महामंडळाकडे संमेलनाविषयीची विचारणा केली होती; पण विदेशवा-याकरण्याची सोय (तेही दुस-यांच्या खर्चाने) नसल्याने महामंडळ पदाधिका-यांनी या संस्थेच्या दोन्ही निमंत्रणांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. मात्र, जगभरात कुठलेच मराठी मंडळ विश्व मराठी संमेलनाच्या आयोजनाला तयार नाही. निम्मा खर्च करण्याची तयारी दाखवूनही नन्नाचा पाढा कायम आहे. त्यामुळे अगतिक होऊन अखेर महामंडळाने ‘शिवसंघ संस्थे’च्या अंदमान येथील निमंत्रणाचा विषय पटावर घेतला आहे.

शिवसंघ संस्थेचे नीलेश गायकवाड म्हणाले, ‘राज्य सरकारने अनुदान दिले नाही तरी प्रायोजकांची मदत न घेता आम्ही अंदमान येथे संमेलन आयोजित करू. मात्र, महामंडळ पदाधिकारी व निमंत्रितांचा प्रवास, निवासाचा खर्च करणे शक्य नाही. अंदमानात भोजन व दर्जेदार कार्यक्रमांची जबाबदारी आम्ही स्वीकारू,’

महानोरांचा नकार
कॅनडातील टोरँटो येथे घोषित झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची निवड करण्यात आली होती; पण टोरँटोपाठोपाठ जोहान्सबर्गचे संमेलनही रद्द झाले. आता अंदमान येथे होऊ घातलेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्यास खुद्द महानोर यांनीच नकार दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष निवडणे अथवा महानोरांची समजूत घालणे, असे पर्याय महामंडळासमोर आहेत.

संमेलनाचा अट्टहास का?
पुण्यात महामंडळ येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत एकही विश्व मराठी साहित्य संमेलन महामंडळाला घेता आले नाही. त्यामुळेचे संमेलनाचा टिळाही महामंडळाला लावून घेण्याची घाई झाली आहे.

विश्व मराठी साहित्य संमेलने
पहिले संमेलन-२००९ सॅन होजे, अमेरिका
दुसरे संमेलन-२०१० दुबई
तिसरे संमेलन-२०११ सिंगापूर
चौथे संमेलन टोरँटो, कॅनडा (रद्द)
जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका (रद्द)