आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील लढत : काँग्रेसचा गड जिंकण्याची भाजपला संधी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला. 1951 पासूनच्या 15 निवडणुकांमध्ये अवघ्या दोनदाच गैरकाँग्रेसी विचारांचा खासदार पुणेकरांनी लोकसभेत पाठवला. 1991 मध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते विठ्ठलराव गाडगीळ यांचा भाजपच्या अण्णा जोशींनी पराभव केला; परंतु त्यांच्या पराभवाला काँग्रेसच्याच नेत्यांनी, विशेषत: शरद पवार यांनी हातभार लावल्याचे काँग्रेसजन सांगतात. त्यानंतर 1999 मध्ये प्रदीप रावत यांच्या रूपात भाजपने दुसर्‍यांदा पुणे जिंकले. याही वेळी कॉँग्रेसी गटबाजीच्या चिखलातूनच कमळ फुलले होते.

गेल्या 2 निवडणुकांत मात्र कॉँग्रेसचे मताधिक्य घटलेले दिसते. 2004 आणि 2009 मध्ये सुरेश कलमाडी यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला असला तरी दोन्ही वेळा ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’विरोधी मतांमध्ये वाढच झाली. दोन वर्षांपूर्वीच्या पुणे महापालिका निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. सध्या पुण्यात आघाडीचे 79, तर युतीचे 41 नगरसेवक आहेत. ‘मनसे’चे 29 नगरसेवक आहेत. पुण्यात महायुतीचे 4, तर आघाडीचे दोन आमदार आहेत. एकूणच पुण्याचे राजकीय चित्र संमिर्श आहे.

या पार्श्वभूमीवर नवा खासदार कोण असणार, यासाठी यंदा तिरंगी लढत रंगणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित पतंगराव कदम काँग्रेसकडून प्रथमच निवडणूक लढवताहेत. गेल्या निवडणुकीत 25 हजार मतांनी पराभूत झालेले भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी यंदा अटीतटीने उमेदवारी मिळवली. मनसेकडून माजी आमदार दीपक पायगुडे रिंगणात आहेत. सांगलीतून आलेल्या कदम यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमधला मोठा गट नाराज आहे. वयाची पस्तिशी न ओलांडलेले कदम आता निवडून आले, तर डोक्यावर बसतील, ही भीती स्थानिकांना वाटते.

कॉँग्रेसजन नाराज
कदम यांनी वैयक्तिक यंत्रणा प्रचाराला लावल्यानेही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. उमेदवारी न मिळाल्याने सुरेश कलमाडी नाराज आहेत. त्यांनी आता कदमांना पाठिंबा दिला असला तरी कलमाडींचे सर्मथक व आमदार विनायक निम्हण अजून प्रचारात सहभागी सक्रिय नाहीत. स्वत: कदम युवक कॉँग्रेसमधून पुण्यात फारसा प्रभाव टाकू शकलेले नाहीत. कदम यांचे सासरे अविनाश भोसले राज्यातले बडे बांधकाम व्यावसायिक आहेत. या नात्याचे काही चांगले आणि बरेचसे वाईट परिणाम कदमांच्या उमेदवारीवर होणार आहेत. दुसर्‍या बाजूला कोरी पाटी असण्याचा फायदा कदम यांना मिळू शकतो. काँग्रेस-राष्ट्रवादीला एकदिलाने कामाला लावण्याचे भलेमोठे आव्हान यशस्वीपणे पेलले, तर विजयाची चव चाखणे कदमांना शक्य होईल.