आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vishwaroop Case Investigation Against Mahindrasingh Dhoni

‘विष्णुरूपी’ महेंद्रसिंग धोनीच्या चौकशीचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - हिंदूधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या विष्णूचे रूप घेऊन बूट, ऑइल, खाद्यपदार्थ, मोबाइल आदींची जाहिरात केल्या प्रकरणावरून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी अडचणीत येण्याची शक्यता आहे. धोनीच्या या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या असल्याची एका पुणेकराची तक्रार न्यायालयाने दाखल करून घेतली असून पोलिसांना चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.


खडकी (पुणे) प्रथमवर्ग न्याय दंडाधिका-यांनी येत्या 15 दिवसांत धोनीविरुद्धच्या तक्रारीची शहानिशा करून गुन्हा नोंदवण्याचे आदेश विश्रांतवाडी पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
देशातील एका प्रसिद्ध इंग्रजी मासिकाच्या कव्हरपेजवर सहा महिन्यांपूर्वी धोनीची कथित आक्षेपार्ह जाहिरात प्रसिद्ध झाली होती. इंडिया अगेन्स्ट करप्शन संघटनेचे कार्यकर्ते आणि पुण्यातील रहिवासी हेमंत पाटील यांनी या जाहिरातीविरोधात संबंधित मासिकाचे दोन संपादक, मार्केटिंग प्रमुख आणि ‘मॉडेल’ महेंद्रसिंग धोनी अशा चौघांविरोधात पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे पाटील यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. पाटील यांच्या याचिकेची सुनावणी सोमवारी झाली. ‘पोलिसांनी धोनी आणि इतर संबंधितांची चौकशी करून गुन्हा दाखल करून घ्यावा,’ असे आदेश न्यायालयाने दिले, अशी माहिती पाटील यांनी दिली.


भावना दुखावल्या
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या देवतांचा वापर मार्केटिंगसाठी केला जातो. इंग्रजी मासिकाने छापलेल्या चित्रात विष्णुरूपी धोनीच्या आठ हातांमध्ये आठ विविध उत्पादने दाखवली आहेत. उत्पादनांच्या विक्रीतून सदर कंपन्यांना आणि ‘मॉडेल’ झालेल्या धोनीला कोट्यवधी रुपये मिळत असले तरी यामुळे अनेकांच्या भावना दुखावतात आणि देवतांचाही अवमान होतो. विक्रेय वस्तूंच्या जाहिरातींसाठी कोणत्याच धर्मातील श्रद्धास्थानाचा वापर होणे योग्य नाही.’’
हेमंत पाटील, याचिकाकर्ता