आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळीच धडा न घेतल्यास कारखाने बंद पडतील!- शरद पवारांच्या साखरसम्राटांना सूचना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दुष्काळाचा धडा वेळीच न घेतल्यास येत्या हंगामात राज्यातील साखर कारखाने बंद ठेवण्याची पाळी अनेकांवर यईल. नजिकच्या भविष्यात ऊसशेती फक्त ठिबक सिंचनावरच करण्याचे धोरण स्वीकारावे लागेल. पुढील वर्षी लागवडीसाठी ऊसबेणे उपलब्ध करण्यासाठीही युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी सूचना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी केली.

वसंतदादा साखर संस्थेच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाची बैठक संस्थेचे अध्यक्ष पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली, या वेळी ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव गिरीधर पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख तसेच नियामक मंडळाचे सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, साखर आयुक्त विजयसिंह सिंघल आदी उपस्थित होते.

यंदाच्या पाणीटंचाईचा खरा फटका येत्या साखर हंगामात बसणार असल्याचे शिवाजीराव पाटील म्हणाले. ‘उजनी आणि जायकवाडी धरण कोरडे पडल्याने मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील उसाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे येत्या हंगामात 400-450 लाख टन ऊसच गाळपास उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. यंदाच्या साखर हंगामात ऊस उपलब्धतेबाबतचा सर्वांचाच अंदाज चुकला. यंदा अपेक्षेपेक्षा 15 लाख टन अधिक ऊस उपलब्ध झाला. काही कारखाने मेपर्यंत सुरू राहतील. एकूण गाळप 760 लाख टनांपर्यंत जाईल,’ असे पाटील म्हणाले.

109 एकर जमिनीची खरेदी- मलठण (जि. पुणे) येथे 109 एकर जमीन खरेदी करण्यास नियामक मंडळाने मान्यता दिली. पंधरा कोटी रुपये किमतीची ही जमीन ऊस संशोधन व बेणे निर्मितीसाठी वापरली जाणार आहे. मराठवाड्यात जालना जिल्ह्यातदेखील शंभर एकर जमीन खरेदी करण्यासाठी ‘व्हीएसआय’ चाचपणी करीत आहे,’ अशी माहिती शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

विलासरावांच्या ‘मांजरा’चे कौतुक - राज्यातील एकूण सिंचनापैकी तब्बल 60 टक्के पाणी फक्त 6 टक्के क्षेत्रावर असलेल्या उसासाठी दिले जाते. भविष्यात एवढे पाणी उसाला देणे शक्य होणार नाही. कारखान्यांनी ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. ‘लातूर जिल्ह्यातील मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के ऊस ठिबकवर घेण्याचे नियोजन आम्ही दुष्काळाआधीच सुरू केले. लवकरच ‘मांजरा’च्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के ऊस ठिबकवर घेतला जाईल,’ अशी माहिती आमदार दिलीपराव देशमुख यांनी दिली. ‘मांजरा’च्या या उपक्रमाचे स्वागत करत त्याचे अनुकरण इतर कारखान्यांनी करावे, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.