आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईच्या गर्दीने फुलली साहित्यनगरी, पुस्तकविक्रीला मोठा प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्ञानाेबा-तुकाेबा साहित्यनगरी, पिंपरी - तरुणांचा सळसळता उत्साह, त्याला ढाेल-ताशांची साथ, मूर्तींपुढे सेल्फी काढण्याची धडपड, ग्रंथप्रदर्शनात पुस्तके चाळण्यासाठी झालेली गर्दी अाणि अालेल्या पाहुण्यांना विविध मंडप वा संमेलननगरीची माहिती देणारे अनेक चेहरे यामुळे संमेलननगरी पहिल्या दिवशी तरुणांच्या गर्दीने फुलली हाेती.

पिंपरी येथे हाेत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी (दि. १५) दिमाखात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी असल्याने डी. वाय. पाटील यांच्या संस्थांच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी दिंडीत जल्लाेष हाेता. ताे दिवसभर दिसून येत हाेता. भव्य प्रवेशद्वारावर उभारलेल्या स्वागत कमानीपासून ते प्रांगणातील ज्ञानाेबा, तुकाेबा, माेरया गाेसावी यांच्या भव्य मूर्तींपुढे सेल्फी काढण्यासाठी या तरुणांनी विशेष गर्दी केली हाेती. गटागटाने तरुण संमेलननगरीतील विविध मंडपांत अाणि ग्रंथप्रदर्शनात फेरफटका मारत हाेते. विशेष म्हणजे अनेक जण मराठमाेळ्या पारंपरिक वेशात या संमेलननगरीत फिरत हाेते. पुण्यात पुणे फिल्म फेस्टिव्हल अाणि वसंताेत्सव सुरू असतानाही पहिल्या दिवशी साहित्य रसिकांचीही चांगली गर्दी दिसून अाली. पिंपरी तशी अाैद्याेगिकनगरी, तरीही संध्याकाळी संमेलनस्थळी ‘काय असते संमेलन’ या कुतूहलातेने कामगार वर्गाने कुटुंबासह हजेरी लावल्याचे चित्र हाेते.

खरेदीला गर्दी
खरे तर अनेक साहित्य संमेलनांमध्ये पहिल्या दिवशी ग्रंथप्रदर्शनात स्टाॅल लागतच असतात; पण या संमेलनात ग्रंथप्रदर्शनाची तयारी ग्रंथदिंडीच्या अाधीच पूर्ण हाेऊन पुस्तकविक्रीही जाेरात सुरू झाली हाेती. मुख्य म्हणजे या ग्रंथप्रदर्शनात तरुण वाचकांची गर्दी अधिक हाेती. फक्त पुस्तकेच नाहीत, तर मराठी अक्षरे लिहिलेले शर्टस‌्, ई-साहित्य, कवितांची पुस्तके, मराठी कॅलिग्राफीच्या फ्रेम्स, इंग्रजी पुस्तके हे खरेदी करण्याकडे पहिल्या दिवशी अधिक अाेढा दिसून अाला. दरम्यान, या ठिकाणी चाेख पाेलिस बंदाेबस्तही तैनात केलेला अाहे.

खाद्य स्टाॅलवर झुंबड
संमेलनस्थळी भव्य डाेम अाहे. ग्रंथदिंडी झाल्यानंतर या स्टाॅल्सवर एकच झुंबड हाेती. येथे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची अनेकांनी चव घेतली. त्याबराेबच इतर स्नॅक्स, अाइस्क्रीम, काेल्ड्रिंक्सही एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने पहिल्या दिवशी अालेल्या सगळ्यांनीच धमाल केली.

पाहुणे मंडळी नाहीत
संमेलनाच्या पहिल्या दिवशी बाहेरगावची मंडळी नव्हतीच. मुळातच पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ध्वजाराेहण एवढेच कार्यक्रम असल्याने अायाेजक संस्थेच्या विद्यार्थ्यांिशवाय त्यात बाहेरची मंडळी फारशी दिसून अाली नाही.

ग्रंथदिंडीसोबत सुमारे ७५ महिलांचे पथक गटागटाने मंगळागौरीचे खेळ करत चालले होते. हे खेळ पारंपरिक पद्धतीचे असल्याने ते पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आणि नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी हातात हात गुंफून घातलेली फुगडी सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली. ग्रंथदिंडीमध्ये डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, पिंपरी- चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यासह खासदार अमर साबळे उपस्थित होते. ग्रंथदिंडीच्या सोबतीने पर्यावरणाचा जागर करणारी पर्यावरण दिंडी, माहिती तंत्रज्ञानवाल्यांची आयटी दिंडी, उद्योगनगरीचे प्रतिनिधित्व म्हणून कामगार दिंडी, देहू-आळंदीचे सान्निध्य म्हणून वारकऱ्यांची दिंडी असे वैविध्य होते. त्या त्या दिंडीला पूरक असे पोशाख परिधान करून तरुणाई मोठ्या संख्येने या दिंड्यांमध्ये दिसत होती.