आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिल्ह्यासाठी अडीचशे कोटींची वार्षिक योजना मंजूर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सोलापूर जिल्ह्याच्या 2013-14 च्या सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी अडीचशे कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतला. सोलापूरच्या वतीने जिल्हा प्रशासनाने 226 कोटींची मागणी करण्यात आली होती.

विभागातील जिल्ह्यासाठी सर्वसाधारण वार्षिक योजना बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुण्यात झाली. नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळूक, सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘टंचाईच्या पार्श्वभूमीवर निधी कमी पडू नये यासाठी मागणीपेक्षा 24 कोटी रुपये अधिक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जुलै 2013 पर्यंत पाण्याचे संकट टळले नाही तरी टंचाईग्रस्त गावांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच यासदंर्भातील कामे प्राधान्याने केली जातील.’ उजनीतील पाणीसाठा वेगाने घटत चालल्याने एप्रिलमध्ये उजनीतून पाणी उपसा करण्यावर र्मयादा येणार आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी उजनीवर अवलंबून असलेल्या गावांच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती कामे हाती घेण्याची गरज आहे. मार्चपूर्वी दुरुस्ती कामे पूर्ण करण्यासाठी टेंडर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अलमट्टीचे पाणी देणार - ‘‘कर्नाटक राज्यात टंचाई असताना यापूर्वी महाराष्ट्राने पाणी दिले होते. यंदा महाराष्ट्राला पाण्याची गरज असल्याने कर्नाटकाकडे पाण्याची मागणी करण्यात आली आहे. अलमट्टी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यास सोलापूर आणि नजीकच्या गावांची तहान भागू शकेल. यासाठी कर्नाटकने पाणी विकत देण्याची भूमिका घेतली तरी त्यासाठी पैसे मोजण्याची राज्य सरकारची तयारी आहे,’’ असे पवार यांनी सांगितले.

टाळूवरचे लोणी खाऊ नका - चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या वाढवून दाखवणे, निकषांपेक्षा कमी चारा देण्याचे गैरप्रकार काही जण करत आहेत. टँकरच्या खेपांची संख्या जास्त सांगणे किंवा अर्धवट भरलेले टँकर पुरवण्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळी कामांमध्येही भ्रष्टाचार करून टाळूवरचे लोणी खाणार्‍यांची गय केली जाणार नाही, असे पवार यांनी सुनावले.