आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाला यश; उजनीला पाणी सुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘उजनीत पाणीच नाही तर सोडता कुठं?’ असे वक्तव्य करून दुष्काळग्रस्तांना खिजवणा-या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चपराक बसली आहे. न्यायालयाच्या निर्णयापुढे झुकत अखेर राज्य सरकारने बुधवारी भामा आसखेड धरणातून 1000 क्युसेक्स आणि आंद्रा धरणातून 250 क्युसेक्स पाणी उजनी धरणासाठी सोडले. भामा आसखेड (ता. खेड) आणि आंद्रा (ता. मावळ) ही दोन्ही धरणे उजनीपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर असल्याने प्रत्यक्ष उजनीत हे पाणी पोहोचण्यास दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.

उजनीत पाणी सोडावे, या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रभाकर देशमुख आणि इतर शेतकरी गेल्या 67 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. अजित पवार यांनी मात्र बेताल वक्तव्य करून उपोषणकर्त्यांची खिल्ली उडवली होती. उजनीच्या पाण्यासाठी दोन शेतक-यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यावर निकाल देताना भीमा सिंचन खो-यातील पाणी 24 तासांच्या आत उजनीत सोडण्याचा आदेश मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे पाणी नसल्याची बतावणी करणा-या पवारांवर नामुष्कीचा प्रसंग ओढवला आहे. अर्थात सोडलेल्या पाण्याचा विसर्ग अत्यल्प आहे. भामा आसखेडमधील आजचा साठा 4.35 टीएमसी आहे. पाण्याची पातळी कमी असल्याने धरणाचे दरवाजे उघडून सांडव्यातून पाणी सोडता येत नसल्याने विद्युतगृहाच्या कालव्यातून विसर्ग सुरू आहे. आंद्रातून याच पद्धतीने पाणी सुटले आहे.

चाळीस दिवस पाणी सोडणार
मंत्रालयात दिवसभर झालेल्या चर्चेअंती बुधवारपासून 40 दिवस भामा आसखेड व आंद्र्रा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. भामा आसखेडमधून अडीच अब्ज घनफूट आणि आंद्रामधून अर्धा अब्ज घनफूट पाणी सोडले जाणार आहे.
अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता, जलसंपदा