आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे जिल्ह्यातील दमदार पावसामुळे खडकवासला, पवनेतून उजनीसाठी विसर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दमदार पावसामुळे भीमा-कृष्णा खोर्‍यातील धरणे तुडुंब भरत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने धरणांचे दरवाजे उघडण्याची वेळ दोन वर्षात प्रथमच आली आहे. पुणे जिल्ह्यातील पवना, खडकवासला व मुळशी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

भीमा-कृष्णा खोर्‍यातील महत्त्वाच्या धरणांमधील साठा 70 टक्क्यांच्या पुढे गेल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातून वाहणारी भीमा आणि तिच्या उपनद्या मुळा, मुठा, इंद्रायणी, पवना दुथडी वाहू लागल्या आहेत. सोलापूरचे डोळे लागून राहिलेल्या उजनीची पाणीपातळी पुणे जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे वेगाने वाढू लागली आहे. पाच जूनला उजनीतला पाणीसाठा उणे 27.05 होता. आज ही टक्केवारी उणे 6.46 आहे. अर्थात उजनी धरण भरण्यासाठी पुण्यात आणखी मुसळधार पावसाची गरज आहे. पानशेत धरण 82 टक्के, वरसगाव 63 टक्के तर चासकमान 86 टक्के भरले आहे. टेमघरही 56 टक्क्यांवर गेले आहे. नीरा देवघर व भाटघर धरणांचा पाणीसाठा 75 टक्क्यांवर गेला आहे.


तीन धरणांतून उजनीसाठी विसर्ग
पवना धरण 84.88 टक्के भरल्याने सोमवारी 2 हजार 200 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. 90 टक्के भरलेल्या खडकवासला धरणातून 2 हजार 12 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. ७६.37 टक्के भरलेल्या मुळशीतून 2 हजार 671 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. शंभर टक्के भरलेल्या आंद्रा धरणातून 1525 क्युसेक्स तर 84 टक्के भरलेल्या कासारसाईमधून 270 क्युसक्सचा विसर्ग सुरू झाला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, धोम, दुधगंगा, राधानगरी, तरळी या धरणांमधील साठा 75 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
आणखी पाऊस बरसणार
बंगालच्या उपसागरात वायव्येला असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर चालून येत आहेत. राज्यातील पावसाळी वातावरण कायम असून येत्या 24 तासात सर्वत्र मध्यम ते जोरदार पावसाची चिन्हे आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यातील पावसाचा जोर कायम होता. सह्याद्री डोंगररांगेतील दावडी येथे सोमवारी राज्यातील सर्वाधिक 180 मिलिमीटर पाऊस कोसळला.


कोल्हापूर जिल्ह्यातील गगन बावडा येथे 160 मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर, डुंगरवाडी, कोयना, ताम्हिणी, भिरा आदी घाटमाथ्यावरच्या गावांमध्ये तब्बल दीडशे मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला.

-----------------------------------------------

गोपाळकाल्याने वारीची सांगता, पालख्या परतल्या
पंढरपूर । प्रतिनीधी
‘गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला’च्या जयघोषात सोमवारी अवघी गोपाळपूरनगरी लाखो वारकर्‍यांच्या गजराने दुमदुमुन गेली. आषाढीचा सोहळा म्हणजे वारकरी संप्रदायातील महाकुंभ मेळाच. परंपरेप्रमाणे काल्याच्या उत्सवाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने पदाधिकार्‍यांनी सर्व पालख्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
आषाढी एकादशीचा अनुप्यम्य सोहळा पार पडल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे होणार्‍या गोपाळकाल्याचे. सोमवारी (ता.22) पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पाच वाजता परंपरे प्रमाणे मानाची अंमळनेरकर महाराजांची पालखी काल्याच्या उत्सवासाठी गोपाळपूर येथील भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर मंदिरात काल्याचे कीर्तन झाले. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचेदेखील पहाटे सहाच्या दरम्यान आगमन झाले. त्यानंतर श्रीसंत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचेही आगमन झाले. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत काल्याचा सोहळा थाटात पार पडला. वारकरी एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गाळाभेट घेत होते. या सोहळ्यानंतर संतांच्या पालखी व वारकर्‍यांनी परतीचा मार्ग धरला.
‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा’ या भावेनेने लाखो वैष्णवांसह संत श्री ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निवृत्तिनाथ, सोपानकाका, मुक्ताई, गजानन महाराज आदींसह विविध संतांच्या पालख्यांनी आज आपल्या गावाकडे प्रस्थान केले.-----------------

‘खिलाडी’ला मराठीचा अभिमान


पुण्यातील रक्तदान शिबिरात अक्षयकुमारची हजेरी
प्रतिनिधी । पुणे
‘ नमस्कार, तुम्ही सारे कसे आहात? मी पंजाबी आहे, पण मला मराठी येते आणि मला त्याचा अभिमानही वाटतो....’ असे स्वच्छ मराठीत बोलत अभिनेता अक्षयकुमारने सोमवारी पुणेकरांची मने जिंकली.
सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे निमित्त साधून बॉलीवूडच्या खिलाडीने आपल्या चाहत्यांना खुश करून टाकले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आमदार अनिल शिरोळे यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. महापौर वैशाली बनकर तसेच अन्य नगरसेवकही उपस्थित होते.
सुधीर गाडगीळ यांनी अक्षयकुमारशी संवाद साधला. राजीव भाटियाचा अक्षयकुमार कसा झाला, या प्रश्नावर अक्षय म्हणाला, त्यासाठी मी कुणाकडे गेलो नाही. मी स्वत: प्रत्येक वेळी कष्ट घेतले आणि त्याचेच फळ म्हणून मी यशस्वी झालो. माझ्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पुण्यातच झाले होते, असेही तो म्हणाला.
चित्रपट शुटिंग दरम्यान, स्टंट करताना डमी वापरला तर त्याला काही होईल की काय, या भीतीपोटी माझे स्टंट्स मी स्वत:च करतो, असेही खिलाडी म्हणाला. ऑलिम्पिकची ज्योत हातात धरणे, हा सर्वोच्च सन्मानाचा क्षण वाटतो, असे त्याने स्पष्ट केले.


मार्शल आर्ट उत्तम उपाय
मार्शल आर्ट हा स्वसंरक्षणाचा उत्तम उपाय आहे. त्याचे प्रशिक्षण शालेय वयापासून आणि शाळेतच मिळाले तर प्रत्येक घरात एक जवान तयार होईल, या अक्षयच्या विधानाला मोठ्या संख्येने उपस्थित तरुणाईने जोरदार प्रतिसाद दिला. खिलाडीची एक झलक कॅमेर्‍यात टिपण्यासाठी असंख्य कॅमेरे, मोबाइल्स यांचा क्लिकक्लिकाट सुरू होता.
-------------------


15 हजार यात्रेकरू नरेंद्र मोदींनी कसे वाचवले? : धस


प्रतिनिधी । बारामती
‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परवानगी घेऊनच मी उत्तराखंडमध्ये गेलो होतो. आम्ही 17 दिवसांत 3014 यात्रेकरू महाराष्ट्रात परत आणले. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकाच दिवसात 15 हजार यात्रेकरूंना कसे वाचवले?’ अशा शब्दात राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांनी सोमवारी मोदींच्या मदतकार्यावर शंका उपस्थित केली. तसेच मदतकार्याच्या वेळी शासनाचा पैसा मिळाला नाही तर ‘पीए’चे एटीएम कार्ड उपयोगात आले, असे सांगून धस यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वह्या वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण आदी उपस्थित होते. धस म्हणाले की, मी सुरुवातीपासूनच पवारांना मानतो. यापूर्वीही दुसर्‍या पक्षात जाताना त्यांची परवानगी घेतली होती. मात्र त्याच पक्षात राहिलो असतो तर वाटोळं झालं असतं. बीड जिल्हा सहकारी बॅँकेचे अर्धे संचालक मंडळ तुरुंगात असून उर्वरित संचालकांनाही तुरुंगाची हवा खावी लागणार आहे, अशा शब्दात त्यांनी मुंडेंवर टीका केली.
माध्यमांच्या कॅमेर्‍याला नमस्कार
माध्यमांवर टीका करताना धस म्हणाले की, शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादीला मीडिया नेहमीच टार्गेट करत असतो. विधानांचा विपर्यास करून बातम्या दिल्या जातात, असे सांगून त्यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कॅमेरामनला नमस्कार घातला. राष्ट्रवादीचे राज्यात बळ वाढविण्यासाठी बारामतीकरांनी अजितदादांना पुरेसा वेळ द्यावा, असे आवाहन करतानाच आगामी मुख्यमंत्री दादाच होणार असे भाकीतही धस यांनी वर्तवले.


-------------------------------
-------------------