आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमोल पालेकरांचे ‘वुई आर ऑन, होऊन जाऊ द्या’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सत्तरच्या दशकात हलकाफुलका, नर्मविनोदी बाज घेऊन अनेक चित्रपट अभिनेते अमोल पालेकरांनी गाजवले. मात्र, दिग्दर्शक पालेकरांनी त्यानंतर चित्रपट करताना गंभीर विषयांना प्राधान्य दिले होते. आता पालेकर एक नवा खुसखुशीत विनोदी चित्रपट घेऊन रसिकांसमोर येणार आहेत. ‘वुई आर आॅन, होऊन जाऊ द्या’ या गमतीदार शीर्षकाचा हा चित्रपट मराठीतील तगड्या कलकारांच्या सहभागाने खुमासदार बनणार असल्याचे संकेत पालेकरांनी येथे दिले. संध्या गोखले यांच्या अनाम निर्मिती या संस्थेची ही पहिली चित्रकृती आहे.
अभिनेता म्हणून मी अनेक हलकेफुलके, विनोदी चित्रपट केले; पण दिग्दर्शक म्हणून उत्तम विनोदी चित्रपटाची संहिता मला मिळाली नव्हती. ती मिळताच मी विनोदी चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, मकरंद अनासपुरे, रमेश भाटकर, मनोज जोशी, पुष्कर श्रोत्री, उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, सतीश पुळेकर, विजय केंकरे यांच्यासह वंदना गुप्ते. निवेदिता सराफ, सुहासिनी परांजपे, आतिषा नाईक अशी तगडी स्टारकास्ट मंडळी या चित्रपटातील विनोद फुलवणार आहे. मराठीतील विनोदपटांची परंपरा व निराळा बाज घेऊन हा चित्रपट येईल, असे पालेकर म्हणाले.
जसे अभिनेते तशी कथा- संध्या गोखले यांनी या चित्रपटाची पटकथा व संवाद लिहिले आहेत. मी लिहिलेल्या समकालीन विनोदाचा पोत पचनी पडेल का याविषयी साशंकता होती, पण या सर्व कलाकारांनी त्याला दाद दिल्याने मी रिलॅक्स आहे. प्रत्येक भूमिकेसाठी नेमका कोण अभिनेता असेल याचे भान ठेवूनच मी ती ती व्यक्तिरेखा लिहिली आहे, असेही त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेला दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ, मकरंद अनासपुरे, मनोज जोशी, विजय केंकरे, सतीश आळेकर आदी उपस्थित होते.